क्रीडा

IND W vs ENG W : भारतीय महिलांची आज निर्णायक लढत; वनडे मालिका जिंकण्यासाठी विजय अनिवार्य

टी-२० मालिकेत यश संपादन केल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही जेतेपद मिळवण्यास भारतीय महिला संघ उत्सुक आहे. मात्र यासाठी भारताला मंगळवारी विजय मिळवणे गरजेचे आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

Swapnil S

चेस्टर ली स्ट्रीट : टी-२० मालिकेत यश संपादन केल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही जेतेपद मिळवण्यास भारतीय महिला संघ उत्सुक आहे. मात्र यासाठी भारताला मंगळवारी विजय मिळवणे गरजेचे आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ मंगळवारी चेस्टर ली स्ट्रीट येथे इंग्लंडविरुद्ध निर्णायक तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

यंदा सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात भारतात महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघ संघबांधणी करत आहे. मे महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह झालेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारताने सहज जेतेपद पटकावले. मुख्य म्हणजे त्या मालिकेत भारताने ३ वेळा ३००हून अधिक धावसंख्या उभारली. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धही भारतीय संघ हाच पवित्रा कायम राखणार का, हे पाहणे रंजक ठरेल. या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषकाला प्रारंभ होणार असल्याने भारतीय महिलांकडे आता संघबांधणी करण्यासाठी फार कमी अवधी आहे. पहिल्या सामन्यात भारताने २५९ धावांचा यशस्वी पाठलाग करून विजयी सलामी नोंदवली. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडने भारताला ८ गडी राखून धूळ चारली.

“गेल्या १-२ वर्षांपासून आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३००हून अधिक धावा करण्यावर भर दिला आहे. यामुळे गोलंदाजांनाही दडपणमुक्त मारा करता येतो. जेव्हा आम्ही प्रथम फलंदाजी करतो, तेव्हा प्रतिस्पर्ध्यावर मोठ्या धावसंख्येचे दडपण आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आता इंग्लंडमध्येही खेळपट्ट्यांचा आढावा घेत आम्ही रणनीती आखू,” असे हरमनप्रीत म्हणाली.

दरम्यान, भारताने नुकतीच इंग्लंडमध्ये प्रथमच टी-२० मालिका जिंकली, तर २०२२मध्ये भारताने आधीच इंग्लंडला एकदिवसीय मालिकेतही पराभूत केले होते. भारतीय संघाची फलंदाजीत प्रतिका रावल, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर भिस्त आहे. फिरकीपटूंवर गोलंदाजीची मदार आहे. दीप्ती शर्मा व अमनजोत कौर या अष्टपैलूंचे योगदान मोलाचे ठरेल.

दुसरीकडे कर्णधार नॅट शीव्हर ब्रंट दुखापतीतून सावरत संघात परतल्याने इंग्लंडची चिंता कमी झाली आहे. डावखुरी फिरकीपटू सोफी एक्केलस्टोनचेही पुनरागमन झाले आहे.

वेळ : सायंकाळी ५.३० वा., थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

IND Vs ENG: भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान! आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

येऊर परिसरात गटारीला ‘नो एन्ट्री’; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोने पुन्हा १ लाखांवर; चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार