नागोया : जपानमधील नागोया येथे आयोजित पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वाची मिजुहो पार्क ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये समारोप समारंभाने सांगता झाली. आठवडाभर रंगलेल्या या स्पर्धेत ४५ देश आणि प्रदेशांतील सुमारे ४,००० खेळाडू व कर्मचारी सहभागी झाले होते. जपानमध्ये प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भारताने या स्पर्धेत विक्रमी ११४ पदकांची कमाई केली. यामध्ये ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्यपदकांचा समावेश आहे. चीनमधील हांगझोऊ येथे २०२३ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने १०८ पदके जिंकली होती. यंदा सहा पदकांची वाढ करत भारताने स्वतःचाच विक्रम मोडला. भारताच्या या यशामुळे पॅरा क्रीडा क्षेत्रातील देशाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली. विविध क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत पदकतालिकेत मोलाचे योगदान दिले. भारताने यंदा केवळ १६८ खेळाडूंचा संघ पाठवला होता. २०२३ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या स्पर्धेत भारताने १०८ पदके जिंकली होती. यंदा तुलनेने कमी खेळाडू असूनही भारतीय खेळाडूंनी अधिक पदकांची भर घातली.
समारोप समारंभात दुहेरी सुवर्णपदक विजेते निशाद कुमार आणि मोना अग्रवाल यांनी भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी स्पर्धेतील यशस्वी मोहिमेचा समारोप केला. भारताच्या पदकविजयात पॅरा ॲथलेटिक्सने सर्वाधिक योगदान दिले. या प्रकारात भारताने २२ सुवर्ण, १९ रौप्य आणि २४ कांस्य अशी एकूण ६५ पदके जिंकली.
पॅरा बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि आठ कांस्य अशी एकूण १६ पदके मिळवली. पॅरा जलतरणात ११, पॅरा टेबल टेनिसमध्ये सात, पॅरा तिरंदाजीत सहा आणि पॅरा नेमबाजीत पाच पदके भारताच्या खात्यात जमा झाली. पॅरा ज्युदो आणि पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी दोन पदके मिळाली. भारतीय नेमबाज मोना अग्रवालने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स एसएच१ प्रकारात ३५७.५ गुणांसह विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
आशियाई पॅरा स्पर्धेची सहावी आवृत्ती २०३० मध्ये दोहा येथे आयोजित केली जाणार आहे. नागोया येथील स्पर्धेत भारताने केलेली विक्रमी कामगिरी आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरणार आहे.
भारताने ३० सुवर्ण, ३५ रौप्य, ४९ कांस्य अशी एकूण ११४ पदके जिंकली. पदकतालिकेत भारताने चौथे स्थान पटकावले. चीन तालिकेत अग्रस्थानी राहिला.
बॅडमिंटन : नितेश, मानसीची चमक
बॅडमिंटनपटूंनी अखेरच्या दिवशी तीन सुवर्णपदके जिंकून भारताच्या यशात मोलाची भर घातली. पॅरिस पॅरालिम्पिक विजेता नितेश कुमार याने पुरुष एकेरीच्या एसएल३ गटात अंतिम सामन्यात प्रमोद भगतचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. त्याने मिश्र दुहेरीत थुलासीमथी मुरुगेसनसोबत रौप्यपदकही जिंकले. स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या नवीन शिवकुमारने पुरुष एकेरीच्या एसएल४ गटात इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावानला २१-९, २१-१७ असे हरवून सुवर्णपदक पटकावले. २४ वर्षीय पॅरिस पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेती थुलासिमथी मुरुगेसन हिने मानसी जोशीसह महिला दुहेरी एसएल३-एसयू५ प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले, तर तिने महिला एकेरी एसयू५ मध्ये रौप्यही मिळवले.
ॲथलेटिक्समध्ये विश्वविक्रम
ॲथलेटिक्समध्ये भारताने सर्वाधिक ६५ पदके जिंकली. संदीपने पुरुषांच्या ४०० मीटर टी६४ शर्यतीत ५२.२८ सेकंदांची विश्वविक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. हनेयने भालाफेक एफ३७/३८ प्रकारात ६०.४९ मीटरची विश्वविक्रमी फेक केली. पॅरालिम्पिक आणि जागतिक विजेता सुमित अंतिलने पुरुषांच्या भालाफेक एफ४२-४४/६१-६४ संयुक्त प्रकारात ७२.४६ मीटरची सर्वोत्तम फेक करत सुवर्णपदक मिळवले. या प्रकारात भारताने तिन्ही पदके जिंकून वर्चस्व गाजवले. महेंद्र गुर्जर आणि संजय संदीप सरगर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले. प्रणव सोर्माने पुरुषांच्या क्लब थ्रो प्रकारात ३२.८७ मीटरची स्पर्धा विक्रमी कामगिरी करत भारताला दिवसातील आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. एकूणच ही कामगिरी कौतुकास्पद ठरली. यामुळे भविष्य ही उज्ज्वल असल्याची खात्री पटली. आता २०३०च्या पॅरा आशियाई स्पर्धेतही अशीच कामगिरी अपेक्षित आहे.