लिंकन : २४वा वाढदिवस साजरा करणारा तिलक वर्मा (१६४ चेंडूंत नाबाद ८१ धावा), कर्णधार ध्रुव जुरेल (९५ चेंडूंत ७१ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (१०७ चेंडूंत नाबाद ५० धावा) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारत -अ संघाने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर आपले वर्चस्व निर्माण केले.
भारत-अ संघाने पहिला डाव १४६ षटकांत ५ बाद ४६४ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड-अ संघाची दिवसअखेर २ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भारत-अ संघाकडे अद्याप ४२८ धावांची भक्कम आघाडी आहे. प्रसिध कृष्णाने प्रतिस्पर्ध्यांच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवले आहे.
दरम्यान, भारत-अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून या मालिकेत भारताच्या वरिष्ठ संघातील काही प्रमुख खेळाडूही खेळत आहेत. उभय संघांतील पहिले दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले. आता तिसऱ्या कसोटीत कोण बाजी मारून मालिकाही जिंकणार, याकडे लक्ष असेल. भारत-अ संघाने रविवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ २ बाद २२७ धावांवरून पुढे सुरू केला. साई सुदर्शनने आपल्या नाबाद ७७ धावांच्या पुढे खेळताना आणखी ११ धावा जोडल्या. मात्र, गिब्सनने त्याला त्रिफळाचीत केले. त्यामुळे त्याचे शतक हुकले.
मग जुरेलने ९५ चेंडूंत ७१ धावांची खेळी केली. त्यात नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याने तिलकसह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जुरेलला कॅमेरून पॉलने बाद केले. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत संधी लाभलेल्या तिलकने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने नाबाद ८१ धावा करतानाच सर्वांची मने जिंकली. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
तिलकने रवींद्र जडेजासोबत ४४ धावांची भागीदारी केली. जडेजाने २५ धावा केल्या. त्यानंतर तिलक आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सहाव्या विकेटसाठी १९७ चेंडूंत नाबाद ११४ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टनने ५० धावांची नाबाद खेळी केली. त्याने १०७ चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केले. तिलकने १३१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. भारत अ संघाने १४६ षटकांत ५ बाद ४६४ धावा करून डाव घोषित केला.
कृष्णाचा भेदक मारा; बुमराही प्रभावी
४२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड-अ संघाची सुरुवात खराब झाली. दुखापतीतून सावरून संघात परतलेल्या वेगवान गोलंदाज कृष्णाने रीस मारियू आणि कर्टिस हेफी यांना बाद केले. दिवसअखेर न्यूझीलंड-अ संघाने २ बाद ३६ धावा केल्या होत्या. डीन फॉक्सक्रॉफ्ट १०, तर झॅक गिब्सन १ धावेवर खेळत होते. जसप्रीत बुमराने ६ षटकांत एक निर्धाव षटक टाकतानाच अवघ्या ११ धावा दिल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी लय मिळवण्याची या लढतीत बुमरा व कृष्णाला संधी आहे. यशस्वीने पहिल्या दिवशी शतक साकारून लय मिळवली आहे.