क्रीडा

अर्शदीप, वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी! भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ विकेट राखून विजय; टी-२० मालिकेत १-१ ने बरोबरी

अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती यांच्या शानदार गोलंदाजीसह वॉशिंग्टन सुंदरच्या २३ चेंडूंत नाबाद ४९ धावांच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने रविवारी १८७ धावांचे विजयी लक्ष्य ५ विकेट राखून गाठले. या विजयामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

Krantee V. Kale

होबर्ट : अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती यांच्या शानदार गोलंदाजीसह वॉशिंग्टन सुंदरच्या २३ चेंडूंत नाबाद ४९ धावांच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने रविवारी १८७ धावांचे विजयी लक्ष्य ५ विकेट राखून गाठले. या विजयामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

टीम डेविडने (३८ चेंडूंत ७४ धावा) भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करत ऑस्ट्रेलियाला निर्धारित २० षटकांत १८६ धावा जमवून दिल्या. भारताचे आक्रमक फलंदाज पाहता विजयी लक्ष्य गाठणे सोपे जाईल अशी अपेक्षा होती. मात्र नॅथन एलिसने (३/३६) अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना त्रास दिला. अखेर १८.३ षटकांत भारताने विजयी लक्ष्य गाठले.

अभिषेक शर्माने (१६ चेंडूंत २५ धावा) पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चोपले. मात्र त्याला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादव (११ चेंडूंत २४ धावा), तिलक वर्मा (२६ चेंडूंत २९ धावा), अक्षर पटेल (१२ चेंडूंत १७ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (२३ चेंडूंत नाबाद ४९ धावा) यांनी भारताच्या विजयात योगदान दिले.

जितेश शर्माने मालिकेतील पहिला सामना खेळताना १२ चेंडूंत नाबाद २२ धावा तडकावत मधल्या फळीत सुंदर सोबत उपयुक्त खेळी खेळली. जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीत भारताला विजय मिळवणे सोपे गेले. ॲशेस मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान शॉर्ट चेंडू टाकत एलिसने भारतीय फलंदाजांना सतावले. मात्र यजमानांच्या अन्य गोलंदाजांनी निराश केले. पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-२० सामना गोल्ड कोस्ट येथे ६ नोव्हेंबरला होणार आहे.

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अर्शदिप सिंगने त्याच्या ४ षटकांत ३ बळी मिळवले. त्यालाच सामनावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले. अर्शदीपने ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंग्लिस यांना बाद करत ऑस्ट्रेलियाला १४/२ अशा अडचणीत टाकले. त्यानंतर टीम डेविडने (३८ चेंडूंत ७४ धावा) जबरदस्त फटकेबाजी करत आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेली. त्याने आपल्या खेळीत ५ षटकार लगावले. त्यातील चार षटकार सरळ मारले. तर एक अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कव्हरच्या वरून मारला. त्याने भारताच्या सर्वच गोलंदाजांना फटके मारले. त्याच्या तावडीतून भारताचा एकही गोलंदाज सुटला नाही. डेविडला २० धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदरने बुमराहच्या गोलंदाजीवर पॉइंटवर एक सोपा झेल सोडून जीवदान दिले. त्याचा फटका भारताला बसला. डेविड बाद झाल्यानंतर अनुभवी मार्कस स्टॉयनिसने ३९ चेंडूंत ६४ धावांची विस्फोटक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला स्पर्धात्मक धावसंख्या उभारून दिली.

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने त्याच्या जागी शिवम दुबेचा समावेश करावा लागला. डेविड आणि स्टॉयनिस यांनी त्याला चांगलेच फटकावले. सहावा गोलंदाजी पर्याय म्हणून भारताकडे वॉशिंग्टन सुंदर उपलब्ध होता. परंतु त्या वेळी डावखुरा फलंदाज मैदानावर नसल्याने अभिषेक शर्माला एक षटक टाकण्याची संधी मिळाली. त्याने या एका षटकात १३ धावा दिल्या.

वरुण चक्रवर्तीने मिचेल मार्श आणि मिचेल ओवेन यांना पाठोपाठ बाद करून ऑस्ट्रेलियाच्या धावगतीवर नियंत्रण मिळवले. ओवेनला त्याने अप्रतिम चेंडू टाकला. शेवटच्या षटकांत अर्शदीप आणि बुमराने उत्तम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

वॉशिंग्टन सुंदरकडे पॉवर हिटर म्हणून पाहिले जात नाही. मात्र रविवारी त्याने ४ षटकार लगावत आपली ताकद दाखवली. वॉशिंग्टन सुंदरने २३ चेंडूंत नाबाद ४९ धावा चोपल्या. अवघ्या एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. भारताच्या विजयात सुंदरचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. त्याने नाबाद खेळी खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

निंजा ओव्हलवर ऑस्ट्रेलिया प्रथमच पराभूत

निंजा ओव्हल (बेल्लीरीवे ओव्हल) या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना पराभूत झाला आहे. याआधी या खेळपट्टीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झालेला नव्हता. रविवारी भारताने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट राखून पराभूत करण्याची कामगिरी केली.

डेविड, स्टॉयनिसची अर्धशतके

संघातील अन्य फलंदाजांनी निराश केले असले तरी टीम डेविड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. डेविडने ३८ चेंडूंत ७४ धावांची वादळी खेळी खेळली. आपल्या या खेळीत त्याने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले. डेविडनंतर मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलियासाठी धावून आला. त्याने ३९ चेंडूंत ६४ धावांची खेळी खेळली.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?