क्रीडा

गिल थेट उपकर्णधार, श्रेयस पुन्हा संघाबाहेर! आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर

बहुप्रतीक्षित आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघातील १५ शिलेदारांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे संघात पुनरागमन झाले असले, तरी श्रेयस अय्यरकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : बहुप्रतीक्षित आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघातील १५ शिलेदारांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे संघात पुनरागमन झाले असले, तरी श्रेयस अय्यरकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल थेट उपकर्णधार म्हणून टी-२० संघात परतल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. एकूणच अवघ्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना भारताच्या संघनिवडीनेही क्रीडाप्रेमींना धक्का दिला आहे, असे म्हणता येईल.

यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजन करण्यात येणार आहे.. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघ यूएईला रवाना होणार आहे. त्यापूर्वी मंगळवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, अन्य सदस्य व कर्णधार सूर्यकुमार यांच्यात संघनिवडीविषयी चर्चा झाली. यावेळी बीसीसीआयचे सचिव देवाजित साइकियादेखील उपस्थित होते. मुंबईतील मुसळधार पावसामुळे यांच्यातील बैठक काहीशी उशिराने सुरू झाली. दुपारी ३च्या सुमारास अखेर संघाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, ३१ वर्षीय वेगवान बुमरा इंग्लंडविरुद्ध झालेल्या जून-जुलै महिन्यात झालेल्या कसोटी मालिकेत पाचपैकी तीन सामने खेळला. वर्कलोड मॅनेजमेंट आणि पाठीवर येणारा ताण यामुळे बुमराला सामन्यांची योग्य निवड करण्याचे सुचवण्यात आले होते. आशिया चषकाची अंतिम फेरी २८ सप्टेंबर रोजी असून २ ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे बुमरा या आशिया चषकात न खेळण्याची शक्यता होती. मात्र बुमराने स्वतःच यासंबंधी निवड समितीशी संवाद साधून आपण खेळण्यास तयार असल्याचे सांगितले. आशिया चषकात बुमराला एका लढतीत ४ षटकेच गोलंदाजी करावी लागेल. त्यामुळे त्याच्या टी-२० संघात परतण्याने भारताची गोलंदाजी बळकट झाली आहे. बुमरा जून २०२४मध्ये टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर १ वर्षाने बुमरा टी-२० संघात परतला आहे.

दुसरीकडे भारतीय संघ गेल्या तीन टी-२० मालिकांपासून अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांना सलामीसाठी प्राधान्य देत आहे. जानेवारी महिन्यात भारताची इंग्लंडविरुद्ध अखेरची टी-२० मालिका झाली. त्यामध्येही या दोघांनी छाप पाडली. त्यामुळे गिल किंवा यशस्वी जैस्वाल यांचे टी-२० संघात पुनरागमन झाल्यास सलामीच्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार, हे निश्चित होते. मात्र आता २५ वर्षीय गिल थेट उपकर्णधार म्हणून टी-२० संघात परतला आहे. त्यामुळे तो सलामीला किंवा तिसऱ्या स्थानी फलंदाजी करणार, हे निश्चित आहे. अशा स्थितीत सॅमसन किंवा तिसऱ्या क्रमांकावरील तिलक वर्मालाच संघाबाहेर रहावे लागेल. कारण अभिषेक हा जागतिक टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असून गरज पडल्यास फिरकी गोलंदाजीही करू शकतो. गिल गतवर्षी जुलै २०२४मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. त्या मालिकेत तोच उपकर्णधार होता. मात्र सप्टेंबरपासून भारताच्या कसोटी व एकदिवसीय मालिका वाढल्याने गिल व यशस्वीला टी-२० प्रकारापासून दूर ठेवण्यात आले होते. मुंबईकर यशस्वीला आशिया चषकासाठी राखीव खेळाडूंत ठेवण्यात आले आहे.

गिलच्या पुनरागमनासह आणखी चर्चेचा मुद्दा म्हणजे श्रेयसला देण्यात आलेला डच्चू. २०२५च्या आयपीएलमध्ये मुंबईकर श्रेयसने पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. श्रेयसने १७ सामन्यांत १७५च्या स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या. त्यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रेयसने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा श्रेयसकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरशी त्याचे फारसे जमत नसल्याचीही चर्चा आहे. ३० वर्षीय श्रेयस २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला आहे. श्रेयस संघाचा भाग नसल्याने काही माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे, तर काहींनी तिलक वर्माच तिसऱ्या स्थानासाठी योग्य असल्याचेही मत व्यक्त केले आहे. तिलक हा जागतिक टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन शतके झळकावली.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत.

मधली फळी भक्कम आणि फिरकीचे तीन पर्याय

यूएईतील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी पोषक असतात, हे सर्वश्रुत आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत दुबईत खेळताना सलग पाच सामने जिंकून फिरकीच्या बळावर वर्चस्व गाजवले. यंदा अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती व कुलदीप यादव भारताच्या टी-२० संघात आहेत. अक्षर फलंदाजीतही उपयुक्त आहे. तसेच भारताने वेगवान गोलंदाजीत बुमराच्या साथीला अर्शदीप सिंग व हर्षित राणाचे पर्याय संघात निवडले आहेत. हार्दिक पंड्याचा भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू असून त्याला पर्याय म्हणून शिवम दुबेही संघाचा भाग आहे. त्याशिवाय सॅमसन संघाचा भाग नसेल, तर जितेश शर्माला यष्टिरक्षणासाठी खेळवणे भाग असेल. मात्र सॅमसन संघात असला, तर सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर रिंकू सिंगला संधी दिली जाऊ शकते. बुमराच्या साथीने दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून कुणाला प्राधान्य मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल. गिल, अभिषेक, तिलक, सूर्यकुमार, अक्षर, हार्दिक, जितेश असे पाच फलंदाज व दोन अष्टपैलू, तर अर्शदीप, बुमरा, वरुण, कुलदीप असे चार गोलंदाज, हे समीकरण भारतीय संघ अवलंबू शकतो.

आशिया चषकासाठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग. राखीव यशस्वी जैस्वाल, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल.

काय म्हणाले सूर्यकुमार-आगरकर?

भारतीय संघात निवड करण्यात आलेल्या १५ खेळाडूंविषयी कर्णधार सूर्यकुमार व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना पत्रकारांनी असंख्य प्रश्न विचारले. त्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

पाकिस्तानविरुद्धच्या प्रश्नाला बगल

अपेक्षेप्रमाणे भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावर आगरकर उत्तर देण्यापूर्वी बीसीसीआयच्या माध्यम प्रतिनिधीने फक्त संघनिवडीविषयी प्रश्नांचीच उत्तरे देण्यात येतील, असे सांगितले. त्यामुळे आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणार की नाही, याविषयी संभ्रम आहे.

त्यामुळेच श्रेयस संघाबाहेर !

श्रेयसकडे अफाट गुणवत्ता आहे, यात शंका नाही. मात्र सध्या टी-२० संघातील प्रत्येक स्थानासाठी जोरदार चुरस आहे. तुम्ही संघातील कोणत्या खेळाडूला बाहेर करून श्रेयसला संधी देणार. भारताच्या दृष्टीने ही बाब चांगली आहे की आपल्याकडे प्रत्येक जागेसाठी स्पर्धा आहे. मात्र दुर्दैवाने संघात १५ खेळाडूंनाच स्थान मिळू शकते, असे आगरकरने सांगितले.

गिल म्हणूनच उपकर्णधार !

जुलै २०२४मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत गिल उपकर्णधार होता. त्यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध त्याने संघाचे नेतृत्वही केले होते. त्यानंतर भारताच्या कसोटी व एकदिवसीय मालिकांच्या दृष्टीने गिलला विश्रांती देण्यात आली. मात्र त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच गिलचे उपकर्णधार म्हणून टी-२० संघात पुनरागमन झाले आहे, असे कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट केले.

बुमरा तंदुरुस्त; फिरकीचे पर्याय मस्त

बुमरा आशिया चषकासाठी संघात परतल्याने आम्ही आश्वस्त आहोत. तो संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध आहे. तसेच भारताकडे वरुण, कुलदीप व अक्षर असे तीन फिरकीचे पर्याय आहेत. त्याशिवाय राखीव खेळाडूंत सुंदरलाही स्थान देण्यात आले आहे. यूएईतील खेळपट्ट्यांचा विचार करता आपल्याकडे उत्तम पर्याय आहेत, असे आगरकर यांनी सांगितले.

आभाळ फाटलं! राज्यात पावसाचे धुमशान; पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू

निकालाला विलंब; ठाकरे गटावर अन्याय होत असल्याची जनभावना

'इंडिया'चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अखेर ठरला; SC चे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा

मुंबईसाठी नवीन २६८ एसी रेल्वे गाड्यांची खरेदी; पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती - मुख्यमंत्री

चिपी विमानतळ सेवा पुन्हा सेवेत येणार; मंत्रिमंडळाची मान्यता