वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा; BCCIकडून सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीतील कार्यक्रमपत्रिका जाहीर 
क्रीडा

वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा; BCCIकडून सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीतील कार्यक्रमपत्रिका जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी भारताच्या पुरुष क्रिकेट संघासाठी २०२६-२७ या वर्षातील मायदेशात रंगणाऱ्या मालिकांचा कार्यक्रम जाहीर केला.

Swapnil S

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी भारताच्या पुरुष क्रिकेट संघासाठी २०२६-२७ या वर्षातील मायदेशात रंगणाऱ्या मालिकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. एकूणच भारतासाठी नॉनस्टॉप क्रिकेट सुरू असेल.

तूर्तास सर्वांचे लक्ष आयपीएलकडे लागून आहे. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीला भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. आता थेट जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होईल. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ शक्यतो विदेशी दौऱ्यांवर असेल. मग सप्टेंबरपासून भारतातील मालिकांना सुरुवात होईल. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका येथे एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने प्रत्येक मालिकेत किमान ३ एकदिवसीय सामने खेळवण्यास प्राधान्य दिले आहे.

सर्वप्रथम वेस्ट इंडिजचा संघ ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामन्यांसाठी भारतात येईल. २७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे सामने होतील. सर्व एकदिवसीय सामने दुपारी २, तर टी-२० लढती सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. यानंतर २२ ऑक्टोबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याचे वेळापत्रक न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड काही कालावधीने जाहीर करेल. संपूर्ण नोव्हेंबर महिना भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये असेल.

डिसेंबरमध्ये मग श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल. यामध्ये ३ एकदिवसीय व ३ टी-२० सामन्यांचा समावेश असेल. १३ ते २७ डिसेंबर या कालावधीत हे सामने होतील. त्यानंतर नवीन वर्षात ३ ते ९ जानेवारी या कालावधीत झिम्बाब्वे संघ ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येईल. यातील तिसरी लढत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल.

मग २१ जानेवारीपासून बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी भारतात येईल. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांचा समावेश असेल. अनुक्रमे नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, रांची व अहमदाबाद येथे या लढती होतील. मुंबई व कोलकाताला कसोटी लढतीच्या आयोजनाचा मान देण्यात आलेला नाही. ३ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा समाप्त होईल. यामध्ये एकदिवसीय मालिका नसतील. मग १०-१५ दिवसांनी आयपीएल २०२७ला प्रारंभ होईल.

मुंबईच्या वाट्याला फक्त एकदिवसीय सामना

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०२६-२७ या हंगामात फक्त एकच आंतरराष्ट्रीय लढत होईल. झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना वानखेडेवर होईल. नुकताच टी-२० विश्वचषकात वानखेडेवर उपांत्य सामना झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी मुंबईत एक लढत होईल, असे अपेक्षित होते. मात्र मुंबईसह कोलकाताच्या ईडन गार्डन्सलादेखील यासाठी वगळण्यात आले आहे. गुवाहाटी, रांची येथे कसोटी सामने खेळवण्याच्या निर्णयावर सध्या चाहत्यांकडून टीका होत आहे.

रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र

शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर

Iran vs US-Israel War : होर्मुझवर इराणची घट्ट पकड, युद्ध आणखी भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता

अनुदानित चिनी, इंडोनेशियन पेपरबोर्ड आयातीविरुद्ध चौकशी; देशांतर्गत उद्योगांवर परिणाम होत असल्याने भारताने उचलले पाऊल

मुंबईत ४० जणांना हवंय इच्छामरण; देशातील हरीश राणाच्या पहिल्या प्रकरणानंतर BMC वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर