क्रीडा

भारताची अंतिम फेरीत धडक! हरमनप्रीतच्या दोन गोलमुळे उपांत्य लढतीत दक्षिण कोरियावर ४-१ असे वर्चस्व

कर्णधार हरमनप्रीत सिंगने दडपणाखाली पुन्हा एकदा कामगिरी उंचावताना त्याला सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर म्हणून का संबोधले जाते, हे सिद्ध केले.

Swapnil S

नवी दिल्ली: कर्णधार हरमनप्रीत सिंगने दडपणाखाली पुन्हा एकदा कामगिरी उंचावताना त्याला सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर म्हणून का संबोधले जाते, हे सिद्ध केले. हरमनप्रीतने केलेल्या दोन गोलसह उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांनीही केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर भारतीय पुरुष संघाने सोमवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारताने उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाला ४-१ अशी धूळ चारली.

चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गतविजेत्या भारतालाच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. यंदा या स्पर्धेचे आठवे पर्व सुरू असून भारताने सर्वाधिक चार वेळा (२०११, २०१६, २०१८, २०२३) ही स्पर्धा जिंकली आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताने साखळीत सलग पाच विजय नोंदवले. भारताने अनुक्रमे यजमान चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांना धूळ चारून अग्रस्थान मिळवले होते. त्यामुळे उपांत्य फेरीतील

विजय पकडून भारताने सलग सहाव्या विजयाची नोंद केली, हे विशेष. दरम्यान, सोमवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने कोरियावर पहिल्या सत्रापासूनच वर्चस्व गाजवले. भारताने साखळीत कोरियाला ३-० असे नमवले होते. यावेळी भारतासाठी १३व्या मिनिटाला अरायजीत सिंगच्या पासवर उत्तमने पहिला गोल केला. याच सत्रात कोरियाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी दोन वेळा गमावली. दुसऱ्या सत्रात मग १९व्या मिनिटाला २८ वर्षीय हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर भारताची आघाडी २-० अशी वाढवली.

मध्यांतराला भारताने २-० अशी आघाडी टिकवली. तिसऱ्या सत्रात मग ३२व्या मिनिटाला जर्मनप्रीतने भारतासाठी तिसरा गोल नोंदवला. ३३व्या मिनिटाला कोरियासाठी सातत्याने चमक दाखवणाऱ्या यांग जी हुनने गोल नोंदवून पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली नाही. ४५व्या मिनिटाला हरमनप्रीतने वैयक्तिक दुसरा व संघासाठी चौथा गोल झळकावून भारताचा विजय पक्का केला.

जेतेपदासाठी आज चीनशी गाठ

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताची मंगळवारी चीनशी गाठ पडेल. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता ही लढत सुरू होईल. चीनने दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानवर पेनल्टी शूटआऊटमध्ये २-० अशी मात केली. पाकिस्तानकडून शूटआऊटमध्ये चारही जणांना गोल करण्यात अपयश आले, तर चीनसाठी लीन व चेन यांनी गोल नोंदवले. २०१२ व २०१३ मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या चीनने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. मात्र त्यांच्या मार्गात चार वेळच्या विजेत्या भारताचे कडवे आव्हान असेल. अंतिम सामन्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी होणाऱ्या लढतीत पाकिस्तान व कोरिया एकमेकांविरुद्ध खेळतील.

हरमनप्रीत हा स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत ७ गोलसह दुसऱ्या स्थानी आहे. कोरियाच्या यांग जी हूनने ८ गोल केले आहेत. मात्र कोरिया स्पर्धेबाहेर गेल्याने हरमनप्रीतला अंतिम सामन्यात अग्रस्थान मिळवण्याची संधी आहे.

संघाच्या विजयात सातत्याने योगदान देत असल्याने समाधानी आहे. हा भारतीय संघ वेगळ्याच आवेशात खेळत आहे. आता अंतिम फेरीतही कामगिरीत सातत्य राखून जेतेपद मिळवू.

- हरमनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण: सोनी टेन-१ वाहिनी आणि जिओ सिनेमा अॅप

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी