एक्स @BCCIWomen
क्रीडा

भारतीय महिलांचा विजयारंभ! प्रतिका, तेजल यांच्या अर्धशतकांमुळे आयर्लंडवर ६ गडी राखून सहज वर्चस्व

भारत-आयर्लंड महिला एकदिवसीय मालिका : प्रतिका रावल (९६ चेंडूंत ८९ धावा) आणि तेजल हसबनीस (४६ चेंडूंत नाबाद ५३) या युवा खेळाडूंनी शुक्रवारी दमदार अर्धशतके झळकावली.

Swapnil S

राजकोट : प्रतिका रावल (९६ चेंडूंत ८९ धावा) आणि तेजल हसबनीस (४६ चेंडूंत नाबाद ५३) या युवा खेळाडूंनी शुक्रवारी दमदार अर्धशतके झळकावली. त्यामुळे भारतीय महिला संघाने २०२५ या वर्षाच विजयी प्रारंभ केला. त्यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला ६ गडी आणि ९३ चेंडू राखून धूळ चारली.

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या या लढतीत आयर्लंडने दिलेले २३९ धावांचे लक्ष्य भारताने ३४.३ षटकांत गाठले. यासह भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १० चौकार व १ षटकारासह एकदिवसीय कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक साकारणारी २४ वर्षीय प्रतिका सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. उभय संघांतील दुसरी लढत रविवारी खेळवण्यात येईल.

हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे महाराष्ट्राची स्मृती मानधना भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. आयर्लंडची कर्णधार गॅबी लेविसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला तिचा हा निर्णय चुकीचा ठरवला. लेगस्पिनर प्रिया मिश्राने एकाच षटकात दोन फलंदाजांना बाद केले. एकवेळ आयर्लंडची ४ बाद ५६ अशी अवस्था होती.

मात्र कर्णधार लेविस आणि सहाव्या क्रमांकावरील लेह पॉल यांनी संघाला सावरले. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी ११७ धावांची दमदार भागीदारी रचली. विशेषत: त्यांनी फिरकीपटूंवर आक्रमण केले. पॉलने ७ चौकारांसह ५९, तर लेविसने १५ चौकारांसह ९२ धावांची खेळी साकारली. पॉल धावचीत झाल्याने ही जोडी फुटली. तर दीप्ती शर्माने लेविसचा अडसर दूर केला. त्यानंतर अर्लेन केलीने २८, तर ख्रिस्टिनाने नाबाद १५ धावा करून आयर्लंडला ५० षटकांत ७ बाद २३८ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताकडून प्रियाने २, तर दीप्ती, तिथास साधू, पदार्पणवीर सायली सातघरेने प्रत्येकी १ बळी मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना प्रतिका आणि स्मृती यांनी आक्रमक सुरुवात केली. त्यांनी १० षटकांतच ७० धावांची सलामी नोंदवली. स्मृतीने २९ चेंडूंत ४१ धावा केल्यावर फ्रेया सर्जंटने तिला बाद केले. मॅग्वायरने मग हरलीन देओलला (२०) जाळ्यात अडकवले. तिच्याच गोलंदाजीवर जेमिमा रॉड्रिग्जही (९) यष्टिचीत होऊन माघारी परतली. ३ बाद ११६ स्थितीतून मग प्रतिका व महाराष्ट्राची २७ वर्षीय तेजल यांची जोडी जमली.

या दोघींनी चौथ्या विकेटसाठी सहजपणे ११६ धावांची भागीदारी रचून विजयाचा मार्ग सुकर केला. तेजलने कारकीर्दीतील पहिलेच अर्धशतक झळकावून प्रतिकाला उत्तम साथ दिली. प्रतिका ८९ धावांवर बाद झाली. त्यानंतर आलेल्या रिचा घोषने २ चेंडूंत २ चौकार लगावून ३५व्या षटकात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तेजल ५३ धावांवर नाबाद राहिली. मॅग्वायरने ३ बळी मिळवून एकाकी झुंज दिली. मात्र एकंदर त्यांचा अनुभव भारतापुढे कमी पडला.

संक्षिप्त धावफलक

आयर्लंड : ५० षटकांत ७ बाद २३८ (गॅबी लेविस ९२, लेह पॉल ५९; प्रिया मिश्रा २/५६) पराभूत वि.

भारत : ३४.३ षटकांत ४ बाद २४१ (प्रतिका रावल ८९, तेजल हसबनीस नाबाद ५३, स्मृती मानधना ४१; एमी मॅग्वायर ३/५७)

सामनावीर : प्रतिका रावल

बोरिवलीची सायली भारतीय संघात

बोरिवलीच्या सायली सतघरेला शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी लाभली. मुंबईची मध्यमगती गोलंदाज असलेल्या सायलीने २०२४च्या महिला आयपीएलमध्ये गुजरात संघाकडून एकमेव लढत खेळली. ऑगस्टमध्ये ती भारत-अ संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी तिला चमूत घेण्यात आले. मात्र पदार्पणाची संधी मिळाली नाही. अखेर आयर्लंडविरुद्ध कुटुबीयांच्या उपस्थितीत तिला कर्णधार स्मृतीच्या हस्ते टोपी देण्यात आली. सायलीने ५०व्या षटकात केलीला बाद करून पहिला बळी मिळवला.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश