नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीवर भारताचे वर्चस्व कायम राहिले. पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात बलाढ्य इराणचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुष संघाने ४०-३४, तर महिला संघाने ३७-३४ अशी विजयी कामगिरी केली. पुरुषांचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील नववे, तर महिलांचे चौथे सुवर्णपदक ठरले.
पुरुष संघाच्या या विजयात अनुभवी खेळाडू पवन सेहरावतला मॅटवर उतरण्याची गरजच भासली नाही. सामन्याच्या मध्यावर भारत अडचणीत असताना अर्जुन देशवाल आणि देवांक यांनी निर्णायक टप्प्यात संयमी आणि आक्रमक खेळ करत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.
इराणने सुरुवातीपासूनच भारताला कडवी झुंज दिली. भारतीय खेळाडूंना लय मिळू न देता इराणने शारीरिक ताकदीचा प्रभावी वापर केला. मध्यंतराला इराणकडे १८-१७ अशी एका गुणाची आघाडी होती. मात्र, भारताने घाबरून न जाता खेळाचा वेग आणि रणनीती बदलली. अर्जुन देशवाल आणि देवांक यांनी इराणच्या बचावफळीवर सातत्याने दबाव टाकत महत्त्वाचे गुण मिळवले. त्यांच्या प्रभावी चढायांमुळे बचावात्मक भूमिकेत गेला.
इराण "मध्यंतराला इराण १८-१७असा आघाडीवर होता. त्यानंतर आम्ही ठरवले की, प्रतिस्पर्ध्याना बाहेर खेचणाऱ्या रेडर्सनाच संधी द्यायची. अर्जुन देशवाल आणि देवांक यांनी ही रणनीती अचूकपणे अंमलात आणली आणि त्यांच्या चढायांनी सामन्याचे चित्रच बदलले," असे पवन सेहरावतने सामन्यानंतर सांगितले.
ऑलआऊटनंतर भारताची पकड मजबूत
सामन्यातील निर्णायक क्षण भारताने इराणवर ऑलआऊट मिळवत आघाडी २९-२४ अशी वाढवली, तेव्हा आला.
सुवर्णपदक जवळ दिसू लागल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अनावश्यक आक्रमकता टाळत संयमी खेळ केला. रेडर्स मध्यरेषेजवळ थांबून योग्य संधीची वाट पाहत होते. इराणला गुणांची गरज असल्याने त्यांच्या रेडर्सना अधिक जोखीम घ्यावी लागली. भारतीय बचावफळीने त्याचा फायदा घेत प्रत्येक प्रयत्नाला अटकाव केला आणि अखेर ४०-३४ असा विजय मिळवला.
महिलांनीही अनुभवाच्या जोरावर बाजी मारली
महिला संघानेही अंतिम सामन्यात इराणला ३७-३४ असे नमवत विक्रमी चौथे सुवर्णपदक पटकावले. साखळी सामन्यात इराणविरुद्ध खेळताना भारतीय संघाने त्यांच्या डाव्या बाजूची कमकुवत बाजू हेरली होती. अंतिम सामन्यात याच रणनीतीचा प्रभावी वापर करण्यात आला.
निकिता, कर्णधार पूजा आणि संजू देवी यांनी डाव्या बाजूने सातत्याने चढाया करत इराणच्या बचावावर दबाव निर्माण केला. भारताने सुरुवातीलाच ३-१ अशी आघाडी घेत इराणला तीन खेळाडूंवर आणले. मात्र, इराणने हार न मानता ७-७ अशी बरोबरी साधली.
भारताच्या आक्रमणात पहिल्या सत्रात अपेक्षित सहजता दिसली नाही; मात्र बचावफळीने संघाला मजबूत स्थितीत ठेवले. कर्णधार पूजाने आक्रमकता आणि संयमाचा सुरेख मेळ साधला. निकिता आणि पूजाने महत्त्वाचे गुण मिळवत भारताला मध्यंतराला २२-१६ अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या मिनिटात इराणने जोरदार प्रयत्न करत अंतर ३७-३४ पर्यंत कमी केले. मात्र, भारताने विजयासाठी आवश्यक आघाडी आधीच मिळवली होती.