संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

अंतिम फेरीचा मार्ग आणखी खडतर; भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे अनिवार्य

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ०-३ अशा फरकाने गमावल्यामुळे भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता भारताला सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची व निर्णायक पाच लढतींची मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.

Swapnil S

दुबई : न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ०-३ अशा फरकाने गमावल्यामुळे भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता भारताला सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची व निर्णायक पाच लढतींची मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३मध्ये डब्ल्यूटीसी म्हणजेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले. आता २ वर्षांनी पुन्हा भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. बांगलादेशविरुद्ध २-० असा मालिका विजय साकारल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अग्रेसर होता. मात्र त्यानंतर नुकताच न्यूझीलंडकडून ०-३ असा दारुण पराभव पत्करल्यामुळे भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. भारतीय संघाच्या खात्यात १४ सामन्यांतील ८ विजय, ५ पराभव व १ बरोबरीचे ९८ गुण आहेत. मात्र टक्केवारीनुसार दुसऱ्या स्थानी आहेत. भारताची टक्केवारी ५८.३३ इतकी आहे, तर ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघाची आता फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका शिल्लक आहे. २२ नोव्हेंबरपासून उभय संघांतील या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी होणाऱ्या कसोटी मालिकेस प्रारंभ होणार आहे. भारताने या पाचपैकी ४ लढती जिंकून एक सामना अनिर्णित राखला, तर त्यांची टक्केवारी ६५.७९ इतकी होईल. त्यामुळे भारतीय संघ अव्वल २ संघांतील स्थान टिकवू शकतो. भारताने पाचही सामने जिंकले, तर त्यांची टक्केवारी ६९.३० इतकी होईल. यामुळे ते अग्रस्थानासह आगेकूच करू शकतील. मात्र भारताने पाचपैकी १ अथवा २ लढती गमावल्यास त्यांची टक्केवारी आणखी घसरेल व अन्य संघांच्या कामगिरीवर त्यांचे भवितव्य ठरेल.

भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व श्रीलंका हे संघ अद्याप अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून आहेत. अग्रस्थानावरील ऑस्ट्रेलियाचे (६२.५० टक्के) भारताविरुद्ध पाच, तर श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने शिल्लक आहेत. यांपैकी त्यांनी किमान ४ कसोटी जिंकल्या, तरी ते अव्वल २ संघांत स्थान राखून अंतिम फेरी गाठू शकतील.

तिसऱ्या क्रमांकावरील श्रीलंकेची टक्केवारी ५५.५६ इतकी आहे. त्यांचे आफ्रिकेविरुद्ध २ व ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ कसोटी सामने शिल्लक आहेत. न्यूझीलंड ५४.५५ टक्क्यांसह चौथ्या स्थानी असून त्यांचे इंग्लंडविरुद्ध मायदेशात ३ कसोटी सामने होतील. दक्षिण आफ्रिका ५४.१७ टक्क्यांसह पाचव्या स्थानी असून त्यांचे श्रीलंकेविरुद्ध २, तर पाकिस्तानविरुद्धही २ सामने शिल्लक आहेत. इंग्लंड व पाकिस्तान अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहे. मात्र त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी जर, तरच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागणार आहे. एकूणच आता अंतिम फेरीची शर्यत आणखी रंगतदार होणार असून पुढील २ ते ३ महिन्यांचा काळ कसोटीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

भारताला मुळीच कमी लेखणार नाही : हेझलवूड

सिडनी : न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने ०-३ अशा फरकाने गमावली असली, तरी ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने व्यक्त केली. “न्यूझीलंडने केलेली कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. भारताला भारतात नमवणे फारच कठीण आहे. मात्र यामुळे भारतीय संघ खडाडून जागा होऊ शकतो. जखमी वाघाप्रमाणे ते पलटवार करण्यास आतुर असतील,” असे हेझलवूड म्हणाला.

भारतावर अधिक दडपण : गिलख्रिस्ट

मायदेशातील कसोटी मालिकेत सपशेल अपयश आल्याने भारतीय संघ आता दडपणाखाली असेल. भारताचे खेळाडू मानसिकदृष्ट्या खचले असतील. याचा ऑस्ट्रेलियन संघाला आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेत फायदा होऊ शकेल, असे मत माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्टने मांडले.

“मायदेशातील कसोटी मालिका अशाप्रकारे गमावणे हा भारतासाठी निश्चित मोठा धक्का असेल. त्यांचे खेळाडू आता दडपणाखाली असतील. तसेच ते स्वत:ला बरेच अवघड प्रश्न विचारत असतील. ऑस्ट्रेलिया त्यांना सहजपणे पराभूत करेल असे नाही. मात्र, भारतीय खेळाडू मानसिकदृष्ट्या काही प्रमाणात खचले असतील. भारताने याआधी कसोटी मालिका कधी गमावली होती हे मला आठवतही नाही. आता तर त्यांना मालिकेतील तीनही सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर बरेच प्रश्न उभे राहिले आहेत,” असे ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक गिलख्रिस्टने सांगितले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी