वेलिंग्टन : गुरनूर ब्रारसहित भारताच्या युवा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीला के. एल. राहुलच्या संयमी फलंदाजीची साथ मिळाल्याने भारताने पावसाचा व्यत्यय आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार चार विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी हॅमिल्टन येथे होणार आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था २६ षटकांत सात बाद ११३ अशी झाली होती. त्यावेळी पावसामुळे खेळ थांबवावा लागला. के. एल. राहुल २६ धावांवर नाबाद होता. डीएलएस नियमानुसार भारताची धावसंख्या १०९ पार असल्याने पंचांनी सामना थांबविल्यानंतर भारताला चार विकेट्सनी विजयी घोषित करण्यात आले.
भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ३० धावांत चार विकेट्स घेतल्या. आकिब नबीने ३१ धावांत दोन, तर अंशुल कंबोजने २५ धावांत दोन विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव अवघ्या ४१ षटकांत १३४ धावांत गुंडाळला. खेळपट्टीवर चेंडूला मिळणारा उसळी आणि स्विंग यामुळे भारतीय फलंदाजांसाठी लक्ष्याचा पाठलाग कठीण ठरला. कर्णधार शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जेकब डफीने त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहलीलाही सात धावांवर डफीने बाद केले. रोहित शर्माने २८ चेंडूंत २३ धावा करत एक षटकार ठोकला; मात्र स्विंग होणाऱ्या चेंडूंविरुद्ध त्याला संघर्ष करावा लागला. स्लिपमध्ये झेल देऊन तो माघारी परतला.
अक्षर पटेल सात धावांवर बाद झाला, तर श्रेयस अय्यरने ३० धावांची खेळी केली. मात्र, जम बसल्यानंतर तोही आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद झाला. दुसरीकडे, राहुलने सुरुवातीला संयम राखत खेळपट्टीवर पाय रोवले. त्याने दोन उत्तम पुल शॉट्स खेळले. त्यातील एका फटक्यावर षटकार ठोकत भारताला विजयाच्या जवळ नेले. त्यानंतर डफीला आणखी एक षटकार लगावत त्याने भारताला शंभर धावांचा टप्पा पार करून दिला. नमन धीर आणि अंशुल कंबोज यांच्या विकेट्स पडल्या, तरी राहुलने खेळपट्टीवर ठाण मांडले. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार शुभमन गिलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला होता. औकिब नबीने टिम सेइफर्टला शून्यावर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अंशुल कंबोजने विल यंग (६) आणि हेन्री निकोल्स (११) यांना माघारी धाडले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था पहिल्या पॉवरप्लेमध्ये तीन बाद २९ अशी झाली.
यानंतर गुरनूर ब्रारने आखूड टप्याच्या चेंडूंचा प्रभावी वापर करत टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांना बाद केले. दोघांनाही त्याने झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था पाच बाद ५३ अशी झाली. डॅरिल मिचेलने १०४ चेंडूंत ५५ धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सँटनरने ३८ चेंडूंत ३१ धावांचे योगदान दिले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.
न्यूझीलंडमध्ये गुरनूरची सर्वोत्तम कामगिरी
भारताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भेदक गोलंदाजी करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. न्यूझीलंडमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजाने केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. ब्रारने १० षटकांत ३० धावा देत चार विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी जवागल श्रीनाथ यांच्या नावावर आहे. त्यांनी २००३ मध्ये ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध २३ धावांत चार विकेट्स घेतल्या होत्या.