India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू 
क्रीडा

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधारपद सांभाळणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

२०२६ टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या १५ सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनुसार, सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासह पत्रकार परिषदेत संघ जाहीर केला. भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या या विश्वचषकात भारत गतविजेत्या संघाच्या नात्याने मैदानात उतरणार आहे.

२०२६ चा टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथील एकूण ८ मैदानांवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाची निवड करताना यंदाच्या हंगामात सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंनाच प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताचा टी-२० विश्वचषक संघातील १५ खेळाडूंची नावे :

  • सूर्यकुमार यादव (कर्णधार)

  • अभिषेक शर्मा

  • संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

  • तिलक वर्मा

  • हार्दिक पांड्या

  • शिवम दुबे

  • ईशान किशन (यष्टीरक्षक)

  • अक्षर पटेल (उपकर्णधार)

  • कुलदीप यादव

  • जसप्रीत बुमराह

  • अर्शदीप सिंग

  • वरुण चक्रवर्ती

  • हर्षित राणा

  • वॉशिंग्टन सुंदर

  • रिंकू सिंग

निवड समितीचे महत्त्वाचे निर्णय

निवड समितीने बहुतांशी तोच संघ कायम ठेवला आहे, जो यंदा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत खेळताना दिसला. खराब फॉर्म असूनही सूर्यकुमार यादव यांच्यावर विश्वास कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, शुभमन गिल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले असून, अक्षर पटेल यांची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या ऑलराऊंडर-केंद्रित धोरणाचे प्रतिबिंब संघनिवडीत स्पष्ट दिसून येते. हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे चारही अष्टपैलू संघात आहेत.

यष्टीरक्षक आणि गोलंदाजी विभाग

संजू सॅमसन आणि ईशान किशन हे दोन यष्टीरक्षक संघात आहेत. किशन हा राखीव सलामीवीराची भूमिकाही बजावणार असून, त्याने २०२३ नंतर प्रथमच टी-२० संघात पुनरागमन केले आहे. देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरीच्या जोरावर त्याची निवड झाली आहे.

गोलंदाजीत फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे असेल, तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सांभाळतील. हर्षित राणा यालाही संघात संधी देण्यात आली आहे, तर प्रसिद्ध कृष्णा राखीव खेळाडूंमध्ये आहे.

घरच्या मैदानावर होणाऱ्या विश्वचषकात भारत पुन्हा एकदा विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल; शनिवारी ६० टक्के मतदान

एपस्टीन फाइल्समधील खळबळजनक फोटो, यादी जाहीर; क्लिन्टन, मायकेल जॅक्सन आदींची नावे

'मविआ'त बिघाडी; काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; भाजप व ठाकरे सेनेविरोधात काँग्रेस मैदानात, रमेश चेन्नीथला यांचा एल्गार

आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका