लंडन : इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ शनिवारी युनायटेड किंग्डममध्ये दाखल झाला. शुक्रवारी रात्री भारतीय संघ मुंबईवरून यूकेसाठी रवाना झाला होता.
आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप २०२५-२७ चा ही मालिका भाग आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघातील बरेच खेळाडू याआधीच इंग्लंडला पोहचले असून इंग्लंड लायन्स विरुद्ध तीन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेत ते भारत ‘अ’ संघातून खेळत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा भाग होणे खासकरून कसोटी संघात असणे हे खूप आनंददायी आहे. इंग्लंडमध्ये तुमचे स्वागत, असे साई सुदर्शन बोलत असलेला व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
२० जूनपासून लीड्स कसोटीला सुरुवात
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला २० जूनपासून लीड्स येथे सुरुवात होणार आहे. दुसरा कसोटी सामना बर्मिंगहम (२ ते ६ जुलै), लॉर्ड्स (१० ते १४ जुलै), मँचेस्टर (२३ ते २७ जुलै) आणि मालिकेतील अखेरची कसोटी ओव्हल (४ ते ८ ऑगस्ट) येथे खेळवला जाणार आहे.