फोटो सौजन्य : FIDE/X
क्रीडा

FIDE Chess World Cup : यंदा भारतात रंगणार पुरुषांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; जाणून घ्या का मिळाले यजमानपद?

फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित करण्यात येणारी पुरुषांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा यंदा भारतात रंगणार आहे. ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरच्या काळात भारताला या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी देण्यात आली आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित करण्यात येणारी पुरुषांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा यंदा भारतात रंगणार आहे. ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरच्या काळात भारताला या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी देण्यात आली आहे. भारतात नेमकी कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येईल, याची घोषणा लवकरच केली जाईल.

सध्या जॉर्जिया येथे महिलांचा विश्वचषक सुरू आहे. त्यानंतर २० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्ताने ‘फिडे’च्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये पुरुषांच्या विश्वचषकाचे यजमानपदाचे हक्क भारताला देण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२१पासून नॉकआऊट पद्धतीने पुरुषांचा विश्वचषक खेळवण्यात येतो.

एकंदर २०६ स्पर्धक पुरुषांच्या विश्वचषकात सहभागी होतील. या विश्वचषकातील विजेता, उपविजेता आणि तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडू २०२६मध्ये होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र होईल. मग कँडिडेट्समधील विजेता जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत भारताच्या डी. गुकेशपुढे आव्हान उभे करेल. गुकेशने २०२४मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी जगज्जेता ठरण्याचा मान मिळवला.

दरम्यान, गुकेश जगज्जेता असला तरी तो विश्वचषकात सहभागी होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त भारताचे आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगेसी, विदीत गुजराथी हे खेळाडू विश्वचषकात खेळताना दिसतील. जागतिक क्रमवारीत पहिल्या ५० क्रमांकात असलेल्या खेळाडूंना पहिल्या फेरीसाठी ‘बाय’ मिळू शकतो.

भारताला यजमानपद का?

-भारताने २००२मध्ये पुरुषांच्या बुद्धिबळ विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. त्यावेळी आनंदनेच विजेतेपद मिळवले. त्यानंतर आता २३ वर्षांनी भारताला यजमानपदाचा लाभ मिळाला आहे. यामध्येही ‘फिडे’चा उपाध्यक्ष आनंदचे मोलाचे योगदान आहे.

-भारताने गेल्या २-३ वर्षांत बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने दुहेरी विजेतेपद पटकावले. मग डिसेंबरमध्ये भारताच्या गुकेशने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. महिलांमध्ये २०२४ या वर्षात भारताच्या हम्पी, वैशाली यांनी अनुक्रमे जलद व ब्लिट्झ प्रकारात विजेतेपद मिळवले. या सर्वांचे फळ म्हणूनच भारताला पुन्हा एकदा विश्वचषकाचे यजमानपद लाभले आहे.

-भारताने यापूर्वी २०२२मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड, टाटा स्टील चेस, २०२४मध्ये कनिष्ठ जागतिक स्पर्धा आणि एप्रिल २०२५मध्ये महिलांची ग्रँड प्रिक्स अशा विविध जागतिक पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धांचे यजमानपद भूषवलेले आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास