बुलावायो : डावखुरा फलंदाज विहान मल्होत्राने (१०७ चेंडूंत नाबाद १०९ धावा) मंगळवारी भारताकडून आयसीसी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) यंदाच्या हंगामातील पहिले शतक साकारले. त्यामुळे भारताने सुपर-सिक्स फेरीत शानदार विजयारंभ करताना यजमान झिम्बाब्वेचा २०४ धावांनी फडशा पाडला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ ३७.४ षटकांत १४८ धावांत गारद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज उधव मोहन व कर्णधार आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. याबरोबरच भारताने सुपर-सिक्स फेरीच्या ब-गटात दुसरे स्थान मिळवले. भारताकडे सध्या ३ सामन्यांत ६ गुण जमा असून त्यांची आता १ तारखेला पाकिस्तानशी गाठ पडेल. विहानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताकडून आरोन जॉर्ज (२३) व वैभव सूर्यवंशी (५२) यांनी आक्रमक सुरुवात करताना ४ षटकांत ४४ धावा केल्या. मग आयुष (२१), वेदांत त्रिवेदी (१५) स्वस्तात बाद झाले. मात्र मुंबईकर अभिज्ञान कुंडू (६१) व विहान यांनी पाचव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी रचून संघाला तीनशे धावांपलीकडे नेले.
झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. मुंबईचा १८ वर्षीय आयुष या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. आयपीएलपासून लक्ष वेधणारा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीसुद्धा भारतीय संघाचा सदस्य आहे. भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. भारताचा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांनी साखळी फेरीत सलग तिन्ही लढती जिंकून आगेकूच केली. भारताने अमेरिका, बांगलादेश व न्यूझीलंड यांना धूळ चारली.
एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यांपैकी प्रत्येकी गटातील आघाडीचे तीन संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-सिक्समध्ये मग सहा-सहा संघांचे दोन गट बनवण्यात येतील. येथे प्रत्येक संघ आपल्या आधीच्या गटातील संघांविरुद्ध न खेळता अन्य गटातून आलेल्या तीन संघांशी खेळणार आहे.
सुपर-सिक्स फेरीतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ६ तारखेला अंतिम सामना रंगेल. यंदा या विश्वचषकाचे हे १६वे पर्व आहे. भारताने सर्वाधिक ५ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. २०२४मध्ये मात्र भारताला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ८ बाद ३५२ (विहान मल्होत्रा नाबाद १०९, अभिज्ञान कुंडू ६१, वैभव सूर्यवंशी ५२; तातेंदा चिमुगोरो ३/४९) विजयी
झिम्बाब्वे : ३७.४ षटकांत सर्व बाद १४८ (लीरॉय चिवुला ६२, कियान बिलग्नॉट ३७; आयुष म्हात्रे ३/१४)
सामनावीर : विहान मल्होत्रा