ताश्कंद : ‘एएफसी २० वर्षांखालील आशियाई कप फुटबॉल पात्रता फेरी’तील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघ सोमवारी सिरियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दुस्तलिक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात सिरियाविरुद्ध पहिला विजय मिळवण्याचे मुख्य उद्दिष्ट भारतीय संघासमोर असणार आहे.
उझबेकिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश असलेल्या ब-गटात भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. “सिरिया हा या स्तरावर अनुभव असलेला चांगला संघ आहे आणि आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही त्यांच्या खेळाचा अभ्यास केला असून काय अपेक्षा ठेवावी, याची कल्पना आहे, परंतु आमचे मुख्य लक्ष स्वतःच्या खेळावरच असेल. चेंडू ताब्यात नसताना आपल्याला संघटित राहावे लागेल आणि मिळणाऱ्या संधींचा पूर्ण फायदा घ्यावा लागेल. हा सामना अत्यंत स्पर्धात्मक होणार असून आपल्याला ९० मिनिटे पूर्ण लक्ष केंद्रित ठेवावे लागेल,” असे भारतीय मुख्य प्रशिक्षक महेश गवळी यांनी सांगितले.
सिरियाने १९९४ मध्ये ‘एएफसी १९ वर्षांखालील स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते आणि गेल्या दोन्ही एएफसी २० वर्षांखालील आशियाई कप स्पर्धांसाठी ते पात्र ठरले आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाने १९७४ मध्ये इराणसोबत या स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद पटकावले होते, मात्र २००६ नंतर भारताला या स्पर्धेत प्रवेश मिळवता आलेला नाही.
मागील २०२५ च्या पात्रता फेरीत गोलफरकाच्या जोरावर भारतीय संघाची संधी थोडक्यात हुकली होती. त्या संघातील २००७ मध्ये जन्मलेला बचावपटू मालेमंगंबा सिंग थोकचोम हा एकमेव खेळाडू सध्याच्या संघात कायम आहे. या मोहिमेसाठी भारतीय संघाने दीर्घ तयारी केली आहे.