कॅनबरा : दिवाळीच्या झगमगाटात रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या संस्मरणीय खेळीचा आनंद लुटल्यानंतर आता तमाम चाहत्यांसह भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला बुधवारपासून कॅनबरा येथे प्रारंभ होणार आहे. आशिया चषक विजेत्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळताना टी-२० मालिकेत यश संपादन करण्यासाठी भारत उत्सुक असेल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकताच पार पडली. मिचेल मार्शच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर २-१ असा विजय मिळवला. मात्र त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने शतक, तर विराटने अर्धशतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली. तसेच अद्यापही आपल्यात धमक असून २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण शर्यतीत असल्याचे दाखवले. मात्र आता भारताच्या युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष असेल.
पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक रंगणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने संघबांधणी करण्यासह प्रयोगांची चाचपणी करण्यासाठी भारताला या मालिकेत संधी मिळेल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात सप्टेंबरमध्ये भारताने दुबईत नवव्यांदा आशिया चषक टी-२० स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता महिन्याभराने भारतीय संघ टी-२० प्रकाराकडे वळला आहे. पुढील ११ दिवसांत भारताला पाच टी-२० सामने खेळायचे आहेत. कॅनबरा (२९ ऑक्टोबर), मेलबर्न (३१ ऑक्टोबर), होबार्ट (२ नोव्हेंबर), गोल्ड कोस्ट (६ नोव्हेंबर) व ब्रिस्बेन (८ नोव्हेंबर) येथे अनुक्रमे लढती होतील.
दरम्यान, कर्णधार म्हणून सूर्यकुमारची कामगिरी उल्लेखनीय असली, तरी फलंदाज म्हणून तो काहीसा फिका पडत आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत २९ पैकी २३ टी-२० सामने जिंकले आहेत. मात्र २०२५ या वर्षात ३५ वर्षीय सूर्यकुमारने १० टी-२० सामन्यांत फक्त १०० धावा केल्या आहेत. तसेच गेल्या १४ सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे कांगारूंविरुद्ध सूर्यकुमारची बॅट तळपेल, अशी आशा आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा भारतावर वर्चस्व गाजवण्यास आतुर असेल. मार्शच्या नेतृत्वात त्यांनी गेल्या १० पैकी ८ टी-२० सामन्यांत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचे काही प्रमुख खेळाडू या मालिकेतील २-३ सामन्यांसाठीच उपलब्ध असतील. पहिल्या लढतीत पावसाचे सावट अजिबात नसून खेळपट्टीकडून फिरकीपटूंनाही सहाय्य मिळेल. येथील सीमारेषा काहीशी लांब असल्याने १५० ते १६० धावांचे सामनेही येथे रंगतदार झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत द्वंद्व पाहायला मिळेल.
मार्श, हेड, हेझलवूड ऑस्ट्रेलियाची ताकद
ऑस्ट्रेलियाच्या संघात एकहाती सामना जिंकवून देणारे अनेक खेळाडू आहेत. कर्णधार मार्शने गेल्या टी-२० मालिकेत याचा प्रत्ययही दिला. तसेच भारताविरुद्ध नेहमीच चमकणारा सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांच्यावर कांगारूंची पुन्हा एकदा मदार असेल. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी बळकट झाला आहे. मात्र झाम्पाच्या अनुपस्थितीत त्यांचा फिरकी विभाग काहीसा कमकुवत वाटत आहे. झाम्पाची पत्नी लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याने झाम्पाने या मालिकेतून माघार घेतली आहे. कुन्हेमन व तन्वीर संघा फिरकी विभागाची धुरा वाहणार असून मिचेल ओवनच्या फटकेबाजीवरही लक्ष असेल.
अभिषेक, तिलकवर फलंदाजीत भिस्त
आशिया चषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानविरुद्ध अंतिम फेरीत जिगरबाज अर्धशतक साकारणारा तिलक वर्मा यांच्यावर प्रामुख्याने फलंदाजीची भिस्त आहे. उपकर्णधार गिलकडूनही फलंदाजीत चमक अपेक्षित आहे. एकदिवसीय मालिकेत गिलला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल व नितीश रेड्डी या अष्टपैलूंचे महत्त्व वाढणार आहे. शिवम दुबे व संजू सॅमसनही फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. सूर्यकुमारने तिसऱ्या स्थानी छाप पाडल्यास आपोआप फलंदाजीची चिंता दूर होईल.
बुमरा परतला; कुलदीपचे काय?
तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या मालिकेद्वारे पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. बुमराच्या साथीने अर्शदीप सिंग व हर्षित राणा वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. मात्र चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव संघातील स्थानासाठी पुन्हा संघर्ष करू शकतो. आशिया चषकात कुलदीपने भारताकडून सर्वाधिक बळी मिळवले होते. तरीही ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर त्याला फक्त तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी लाभली. अक्षर, वरुण चक्रवर्ती व वॉशिंग्टन सुंदर हे अन्य फिरकी पर्यायही भारताकडे आहेत. त्यामुळे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी हवी असल्यास कुलदीपला प्रतीक्षा करावी लागू शकते.
उभय संघांत आतापर्यंत ३२ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २०, तर ऑस्ट्रेलियाने ११ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), सीन ॲबट, झेव्हियर बार्टलेट, माहली बीयर्डमन, टिम डेव्हिड, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुन्हेमन, मिचेल ओवन, जोश फिलिपे, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टोइनिस.
वेळ : दुपारी १.४५ वाजता g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप