क्रीडा

उपांत्य फेरीची रणधुमाळी आज, आशिया चषकात भारतीय महिलांची बांगलादेशशी गाठ; पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे आव्हान

Swapnil S

दाम्बुला : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाची आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी दुपारी रंगणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशशी गाठ पडेल. तर सायंकाळी दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे कडवे आ‌व्हान असेल.

बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान महिलांचा टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे. गेल्या चार हंगांमांपासून टी-२० प्रकारात आशिया चषक खेळवण्यात येत आहे. २०२२मध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारून सातव्यांदा जेतेपद मिळवले होते. आतापर्यंत ४ वेळा एकदिवसीय, तर ४ वेळा टी-२० प्रकारात महिलांची ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. त्यापैकी फक्त २०१८मध्येच भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अन्यथा प्रत्येक वेळी भारतानेच बाजी मारली आहे.

भारताने पहिल्या लढतीत पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला ७८ धावांनी धूळ चारली. तिसऱ्या लढतीत मग नेपाळला ८२ धावांनी नेस्तनाबूत करून भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली. दुसरीकडे बांगलादेशने ब-गटात ३ सामन्यांतील २ विजयांच्या ४ गुणांसह दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी भारत-बांगलादेश यांच्यातील मालिकेत दोन्ही संघांतील खेळाडूंत पंचांच्या निर्णयावरून वादही झाला होता. त्यामुळे या सामन्याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत.

शफाली, स्मृतीवर फलंदाजीत भिस्त

भारतीय फलंदाजांची भिस्त प्रामुख्याने डावखुरी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीवर असेल. शफालीने नेपाळविरुद्ध ८१ धावांची तुफानी खेळी साकारून सूर गवसल्याचे संकेत दिले. तसेच कर्णधार हरमनप्रीतही उत्तम लयीत आहे. याव्यतिरिक्त, रिचा घोष, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज असे फलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. गेल्या लढतीत छाप पाडलेल्या दयालन हेमलतावरही लक्ष असेल. सजीवन सजना व अरुंधती रेड्डी यांना मात्र हरमनप्रीत व पूजा वस्त्रकार परतल्याने संघाबाहेर जावे लागू शकते. गोलंदाजीत पूजा लयीत असल्याने ती व रेणुका सिंग वेगवान माऱ्याची धुरा वाहेल. आशा शोबना, राधा यादव, तनुजा कन्वर यांचे फिरकी त्रिकुटही भारताकडे उपलब्ध आहे. श्रेयांका पाटील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने तनुजाला संघात स्थान देण्यात आले आहे.

बांगलादेशविरुद्ध भारताने १३ पैकी ११ टी-२० लढती जिंकल्या

भारत-बांगलादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या १३ टी-२० सामन्यांत भारताने तब्बल ११ लढती जिंकल्या आहेत. तर बांगलादेशला फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. तसेच भारताने २०२४ या वर्षात १४ पैकी १० टी-२० सामन्यांत यश संपादन केले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त