(Photo-X/@ICC)
क्रीडा

IND vd ENG ICC T20 WC26 : भारताची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक; वानखेडेवर रंगलेल्या थरारक उपांत्य सामन्यात इंग्लंडवर ७ धावांनी सरशी

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात भारताने अखेर इंग्लंडवर ७ धावांनी सरशी साधली आणि टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Swapnil S

मुंबई : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात भारताने अखेर इंग्लंडवर ७ धावांनी सरशी साधली आणि टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ३० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत संजू सॅमसनने (४२ चेंडूंत ८९ धावा) झळकावलेले शानदार अर्धशतक व जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांनी दडपणात केलेली प्रभावी गोलंदाजी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

२००७ व २०२४च्या विश्वविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करून एकंदर तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता रविवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान असेल. ८ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे ही लढत होईल. भारताने न्यूझीलंडला आजवर टी-२० विश्वचषकात एकदाही नमवलेले नसल्याने अंतिम लढतीत पुन्हा एकदा भारताला इतिहास खुणावत आहे.

दरम्यान, भारत-इंग्लंड टी-२० विश्वचषकात पाच वेळा आमनेसामने आले होते. मुख्य म्हणजे इंग्लंडने २०२२च्या उपांत्य फेरीत भारताला नमवले, तर २०२४च्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला हरवले. त्यामुळे २०२६मध्ये काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडने कडवी झुंज दिली. मात्र त्यांना २० षटकांत ७ बाद २४६ धावांवर समाधान मानावे लागले. जेकब बेथलने दिलेली शतकी झुंज व्यर्थ ठरली. त्याने ४८ चेंडूंत १०५ धावा फटकावल्या.

अक्षर पटेलने केलेले अफलातून क्षेत्ररक्षण व १८ चेंडूंत ४५ धावांची गरज असताना बुमराने टाकलेली फक्त ६ धावांची ओव्हर, हे दोन मुद्दे भारताच्या विजयात नक्कीच लक्षवेधी ठरले. फलंदाजीत सॅमसनव्यतिरिक्त इशान किशन (१८ चेंडूंत ३९), शिवम दुबे (२५ चेंडूंत ४३), हार्दिक (१२ चेंडूंत २७), तिलक वर्मा (७ चेंडूंत २१) यांनीही उपयुक्त फटकेबाजी केली.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या १०व्या पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६ नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता.

या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका व भारत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या गटातून इंग्लंड व न्यूझीलंड यांनी आगेकूच केली होती. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. आता त्यांच्यासमोर रविवारी भारताचे आव्हान असेल.

भारताने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकताना अनुक्रमे अमेरिका, पाकिस्तान, नेदरलँड्स व नामिबिया या संघांना नमवले. मग सुपर-आठ फेरीत भारताला पहिल्याच लढतीत आफ्रिकेकडून दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र त्यातून सावरत भारताने झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज यांना पराभूत केले. आता इंग्लंडला नमवून भारताने एकंदर चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. भारताने २००७ व २०२४मध्ये टी-२० विश्वचषक उंचावलेला आहे. तर २०१४मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

दुसरीकडे हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लडंने साखळी फेरीतून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. मात्र सुपर-आठ फेरीत त्यांनी लय मिळवताना सलग तीन विजयांसह अग्रस्थान पटकावले. इंग्लंडने २०१० व २०२२मध्ये टी-२० विश्वचषक जिंकलेला आहे. तर २०१६मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र सलग दुसऱ्या टी-२० विश्वचषकात त्यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद २५३ (संजू सॅमसन ८९, शिवम दुबे ४३, इशान किशन ३९, हार्दिक पंड्या २७, तिलक वर्मा २१; विल जॅक्स २/४०) विजयी वि. g इंग्लंड : २० षटकांत ७ बाद २४६ (जेकब बेथल १०५, विल जॅक्स ३५; हार्दिक पंड्या २/३८, जसप्रीत बुमरा १/३३)

सामनावीर : संजू सॅमसन

आजचे राशिभविष्य, ६ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मार्च महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

काँग्रेसचा शरणागतीचा इतिहास कसा विसरता!

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी