मुंबई : भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठदुखीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला पूर्णपणे मुकणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. बुमराच्या जागी जादुई फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी राखीव खेळाडू म्हणून असलेला वेगवान गोलंदाज हर्षित राणासुद्धा एकदिवसीय मालिकेसाठी मुख्य संघात दाखल झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी जाहीर केलेल्या एकदिवसीय मालिकेसाठीच्या सुधारित संघात बुमराचे नाव नव्हते.
भारत-इंग्लंड यांच्यात ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळणार असला तरी ३१ वर्षीय बुमराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील समावेशाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत बुमराची पाठ दुखू लागल्याने त्याने मैदान सोडले होते. त्यानंतर बुमरा पुन्हा खेळताना दिसलेला नाही. सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूच्या निगराणीखाली आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत १४ बळी मिळवण्यासह मालिकावीर ठरलेल्या वरुणला कामगिरीचे फलित लाभले असून त्याला आता एकदिवसीय सामन्यांसाठीही संधी देण्यात आली आहे. १८ टी-२० सामन्यांचा अनुभव असलेल्या वरुणने एकदिवसीय प्रकारात भारतासाठी अद्याप एकही लढत खेळलेली नाही. त्यामुळे ३३ वर्षीय वरुणचे या मालिकेत पदार्पण होऊ शकते. तसेच या तीन एकदिवसीय सामन्यांतील कामगिरीच्या आधारे त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारताच्या मुख्य संघात समावेश करण्याची शक्यता बळावली आहे. यंदाच्या विजय हजारे या देशांतर्गत एकदिवसीय स्थानिक स्पर्धेत वरुणने ६ सामन्यांत १८ बळी मिळवले होते.
“वरुणचा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तो नागपूर येथे भारतीय संघासह सराव करण्यासाठी दाखल झाला आहे,” असे बीसीसीआयने पत्रकात नमूद केले. भारतीय संघ अनुक्रमे नागपूर, कटक (९ फेब्रुवारी) आणि अहमदाबाद (१२ फेब्रुवारी) येथे इंग्लंडविरुद्ध तीन सामने खेळणार आहे.
या मालिकेसाठी रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल व कुलदीप यादव हे चार फिरकीपटू आधीच संघात आहेत. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी व अर्शदीप सिंग संघाचा भाग आहेत. मात्र बुमरा पहिल्या दोन सामन्यांना मुकणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे हर्षितला राखीव खेळाडू म्हणून संघात ठेवले होते. आता त्याला मुख्य संघात सहभागी करण्यात आले असून नुकताच टी-२० मालिकेत हर्षितने लक्ष वेधले होते. मात्र अनुभवी बुमरा किमान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघात परतेल, अशी आशा तमाम चाहते बाळगून आहेत.
वरुणवर एकदिवसीय मालिकेत तोडगा काढू : पीटरसन
वरुणचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश करणे कौतुकास्पद असून तो नक्कीच याचा हकदार आहे. मात्र इंग्लंडचे फलंदाज या मालिकेत त्याच्यावर तोडगा काढतील, असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने व्यक्त केले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमासाठी पीटरसन उपस्थित होता. वरुणने टी-२० मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांना हैराण केले. “वरुणविरुद्ध एकदिवसीय मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांकडे अतिरिक्त वेळ असेल. त्यामुळे ते येथे संयम बाळगून खेळतील, अशी आशा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका निर्णायक ठरणार असून भारताचे रोहित, विराट यामध्ये कसे खेळतात, याकडे माझे विशेष लक्ष असेल,” असे पीटरसनने सांगितले.
नागपूरमध्ये भारतीय खेळाडूंचा जोरदार सराव
भारतीय संघ मंगळवारी सकाळी नागपूरमध्ये दाखल झाला. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जामठा येथे भारत-इंग्लंड यांच्यातील पहिली लढत होणार असून भारतीय खेळाडूंनी सायंकाळी जोरदार सराव केला. विराट, रोहितसह सर्व खेळाडू घाम गाळताना दिसले. या मालिकेत विराट, रोहितकडे प्रामुख्याने चाहत्यांचे लक्ष असेल. गेल्या काही काळापासून दोघांचीही बॅट थंडावलेली आहे. तसेच रणजी स्पर्धेत पुनरागमन केल्यानंतरही दोघांना छाप पाडता आली नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या दोघांकडून धावांचा वर्षाव अपेक्षित आहे.
यशस्वी, अभिषेकशी कोणतीही स्पर्धा नाही : गिल
भारतीय संघाचा उपकर्णधार गिलने त्याची यशस्वी जैस्वाल किंवा अभिषेक शर्मा यांच्यापैकी कुणाशीही स्पर्धा नाही, असे स्पष्ट केले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितच्या साथीने गिलच सलामीला येणार आहे. मात्र यशस्वीचा पर्यायी सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच टी-२० प्रकारात अभिषेकही सातत्याने छाप पाडत आहे. त्यामुळे गिलचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र गिलने आम्हा तिघांमध्ये यावरून एकदाही चर्चा झलेली नाही. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. जो संघात खेळेल, तो सर्वोत्तम कामगिरीच करेल, असे मत नोंदवले.
भारताचा सुधारित संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.