दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारचा दिवस जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीच्या पर्वणीचा असेल. दुबईच्या रणांगणात रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात द्वंद्व रंगणार असल्याने स्पर्धेचा ज्वर आता खऱ्या अर्थाने गगनाला भिडणार आहे. एकीकडे सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्याचे भारताचे लक्ष्य असेल, तर दुसरीकडे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी यजमान पाकिस्तानला ही लढत जिंकणे अनिवार्य आहे.
गेल्या असंख्य वर्षांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीचे औत्सुक्य टिकून आहे. बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे या संघांमधील सामन्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धा अथवा आशिया चषकाच्या निमित्तानेच चाहत्यांना या दोन संघांमधील थरार पाहता येतो. त्यातच २०१७मध्ये झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला नमवले होते. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारे भारताचे शिलेदार त्या पराभवाचा वचपा घेण्यासही आतुर असतील. भारताने अ-गटातील पहिल्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारून धडाक्यात प्रारंभ केला. विराट कोहलीच्या कामगिरीवर या लढतीत चाहत्यांचे प्रामुख्याने लक्ष असेल.
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानला मात्र न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. यजमान देश असूनही दुबईत या लढतीसाठी दाखल झालेल्या पाकिस्तानवर साखळीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवू शकते. त्यामुळे ते भारताला कितपत टक्कर देणार, हे पाहणे रंजक ठरेल. भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी यांच्यातील जुगलबंदीवर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत धावांच्या वर्षावासह फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळू शकते.
खेळपट्टी आणि वातावरण
दुबईत सायंकाळच्या वेळेस दव जास्त येत नसल्याने प्रथम फलंदाजी करण्यास संघांचे प्राधान्य असेल. फिरकीपटू या खेळपट्टीवर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३०० ते ३२० धावा केल्यास धावांचा पाठलाग करणे कठीण जाईल.
या लढतीवर पावसाचे सावट अजिबात नाही. उलट खेळाडूंना दुबईतील उष्णतेचा त्रास होऊ शकतो. रविवारी ३५ अंशापर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे.
रोहित, गिल लयीत; विराटकडून अपेक्षा
रोहित आणि शुभमन गिल या भारतीय सलामीवीरांनी बांगलादेशविरुद्ध धडाक्यात सुरुवात केली. विशेषत: गिल तुफान फॉर्मात असून त्याने सलग दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे आता फक्त विराटचीसुद्धा बॅट तळपावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटने नेहमीच दडपणाखाली कामगिरी उंचावली आहे. त्यामुळे तो मोठी खेळी साकारून १४ हजार एकदिवसीय धावांचा टप्पा गाठण्यासही उत्सुक असेल. श्रेयस अय्यर चौथ्या स्थानी पुन्हा मोलाचे योगदान देईल. यष्टिरक्षक के. एल. राहुलनेही लय गवसल्याचे संकेत दिले आहेत. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल असे अष्टपैलूही भारताच्या ताफ्यात आहेत.
शमी आणि फिरकीपटूंवर भारताची भिस्त
जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. बांगलादेशविरुद्ध शमीने ५ बळी मिळवून प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला. शमीच्या साथीने पाकिस्तानविरुद्ध हर्षित राणाच खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगला प्रतीक्षा करावी लागू शकते. कुलदीप यादव, जडेजा व अक्षर यांचे फिरकी त्रिकुट भारतासाठी निर्णायक ठरेल. विशेषत: भारताने प्रथम फलंदाजी केली, तर दुसऱ्या डावात मधल्या षटकांत धावा रोखण्यासह बळी मिळवण्यात या तिघांचा मोलाचा वाटा असेल.
१५ धावांची गरज
विराटला एकदिवसीय कारकीर्दीतील १४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १५ धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यानंतरचा विश्वातील तिसरा फलंदाज ठरेल.
वेगवान त्रिकुटापासून सावध
शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरीस रौफ या पाकिस्तानच्या वेगवान त्रिकुटापासून भारताला सावध रहावे लागेल. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहितने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमण केले होते. त्यामुळे पॉवरप्लेची षटके निर्णायक ठरतील. फिरकीपटूंचा विचार करता अब्रार अहमद आणि सलमान यांच्यावर पाकिस्तान अवलंबून आहे.
बाबर, रिझवानवर पाकची मदार
फलंदाजीत पाकिस्तानची प्रामुख्याने अनुभवी बाबर आझम आणि कर्णधार रिझवान यांच्यावर भिस्त आहे. बाबरने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र त्याच्या स्ट्राइक रेटविषयी सगळीकडे चर्चा सुरू आहे. फखर झमान दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने इमाम उल हक बाबरसह सलामीला येऊ शकतो. सलमान अघा व खुशदील शाह यांच्याकडून पाकिस्तानला फलंदाजीत पुन्हा सातत्य अपेक्षित आहे.
फ्लॅश बॅक
२००४
बर्मिंगहॅम येथे २००४मध्ये भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्यांदाच आमनेसामने आले. मात्र मोहम्मद युसूफच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानने भारताला ३ विकेट राखून नमवले.
२००९
शोएब मलिकच्या शतकाच्या बळावर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर सलग दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानच्या ३०२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २४८ धावांत गारद झाला.
२०१३
भुवनेश्वर कुमारसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानला ८ गडी राखून धूळ चारली. भारताचा हा त्यांच्याविरुद्ध पहिलाच विजय ठरला.
२०१७
रोहित, विराट, धवन आणि युवराज सिंग यांच्या अर्धशतकांमुळे भारताने २०१७मध्ये साखळी सामन्यात पाकिस्तानसमोर ३२० धावांचे लक्ष्य ठेवले. मग पाकिस्तानचा संघ १६४ धावांतच गारद झाला.
२०१७
२०१७च्याच चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने आले. त्यावेळी फखर झमानचे शतक आणि मोहम्मद आमीरच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानने भारताला १८० धावांनी नेस्तनाबूत करून जेतेपद पटकावले.