क्रीडा

IND vs SA Test : जगज्जेत्यांविरुद्ध भारताची कसोटी; कोलकाता येथे आजपासून दक्षिण आफ्रिकेशी पहिला सामना, पंतच्या पुनरागमनाकडे लक्ष

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय कसोटी संघ मायदेशात नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन लढतींच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे.

Swapnil S

कोलकाता : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय कसोटी संघ मायदेशात नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन लढतींच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारताचा नक्कीच कस लागेल. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पुनरागमनाकडेही सर्वांचे लक्ष असेल.

१४ नोव्हेंबरपासून आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे पहिली कसोटी खेळल्यानंतर २२ तारखेपासून उभय संघांत गुवाहाटी येथे दुसरी कसोटी होईल. त्यानंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे गिलच्या नेतृत्वात तसेच प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारतीय संघ जगज्जेत्या आफ्रिकेला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६मध्ये असेल. तूर्तास भारत डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ६१.९० टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान, डावखुऱ्या पंतचे तीन महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. २६ वर्षीय पंतला जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे पंत आशिया चषकासह वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका व ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकला. मात्र दक्षिण आफ्रिका-अ संघाविरुद्ध पंतने भारत-अ संघाचे नेतृत्व करताना तंदुरुस्ती सिद्ध केली. तसेच दुसऱ्या डावात ९० धावांची खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिला. पंत संघात परतल्याने तोच यष्टिरक्षक असणार, हेसुद्धा स्पष्ट झाले.

टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणारा आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी येत आहे. त्यावेळी भारताने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही केशव महाराज, सेनुरान मुथुस्वामी व सिमॉन हार्मर असे फिरकीपटू आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रमुख फलंदाजांना संधी देण्यावर भारताचा भर आहे. त्यामुळे नितीश रेड्डीलाही संघातून मुक्त करण्यात आले आहे.

भारताची गिल, यशस्वीवर फलंदाजीत भिस्त

इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारे गिल व यशस्वी जैस्वाल यांच्या फलंदाजीवर पुन्हा एकदा संघाची भिस्त असेल. तसेच ध्रुव जुरेल संघात सहाव्या किंवा सातव्या स्थानी खेळणार असल्याने भारताची फलंदाजी खोलवर लांबलेली आहे. सलामीवीर के. एल. राहुल आफ्रिकेच्या फिरकीपटूंविरुद्ध तंत्रशुद्ध फलंदाजी करू शकतो. तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शन व पुनरागमन करत असलेला पंत लय मिळवण्यास किती वेळ घेणार, हे पाहणे रंजक ठरले. रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर असे दोन फिरकी अष्टपैलू भारताच्या ताफ्यात असून ते फलंदाजीतही हमखास योगदान देतात.

कुलदीपला संधी की तिसरा वेगवान गोलंदाज?

जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा वाहतील, हे स्पष्ट आहे. मात्र खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळण्याची शक्यता असल्याने भारतीय संघ तिसरा वेगवान गोलंदाजही खेळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल. जडेजा, सुंदर व कुलदीप यादव यांचे फिरकी त्रिकुट विंडीजविरुद्ध दोन्ही सामन्यांत खेळले. मात्र जडेजा व सुंदर हे फलंदाजीतही उपयुक्त असल्याने गरज पडल्यास संघ व्यवस्थापन कुलदीपला विश्रांती देऊ शकते. मात्र शक्यतो तरी भारताने कुलदीपसह तिन्ही फिरकीपटूंना संधी द्यावी. कारण भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांच्याविरुद्ध आफ्रिकेचे फलंदाज नक्कीच चाचपडताना दिसतील.

बव्हुमा, महाराज, मार्करम आफ्रिकेची ताकद

आफ्रिकेला जागतिक कसोटी जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा कर्णधार बव्हुमा, अनुभवी फिरकीपटू केशव महाराज व एडीन मार्करम हे त्रिकुट त्यांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीत कगिसो रबाडा व मार्को यान्सेन जोडी भारतासाठी घातक ठरू शकते. फलंदाजीत रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, वियान मल्डर असे युवा खेळाडू प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांची भारताच्या फिरकीविरुद्ध परीक्षा असेल. महाराजला सेनुरान मुथुस्वामी व सिमॉन हार्मर या फिरकीपटूंची साथ लाभेल. एकूणच या मालिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

  • ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असेल. मात्र काळ्या मातीच्या या खेळपट्टीवर पाचव्या दिवसापर्यंत लढत लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • पाचही दिवस येथे कडक ऊन असेल. तसेच दरदिवशी सकाळी पहिल्या तासाच चेंडू पुरेसा स्विंग होईल. तसेच येथे धुक्यांचाही परिणाम जाणवू शकतो. फलंदाजांना पहिल्या दोन दिवशी धावा जमावण्याची उत्तम संधी आहे.

४४ कसोटी

उभय संघांत आतापर्यंत ४४ कसोटी सामने झाले असून भारताने त्यापैकी १६, तर आफ्रिकेने १८ लढती जिंकल्या आहेत. १० कसोटी सामने अनिर्णित राहिलेले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बव्हुमा (कर्णधार), एडीन मार्करम, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, कायले वेरान, डेवाल्ड ब्रेविस, झुबेर हाम्झा, टॉनी डी झॉर्झी, कॉर्बिन बोश, वियान मल्डर, मार्को यान्सेन, केशव महाराज, सेनुरान मुथुस्वामी, कगिसो रबाडा, सिमॉन हार्मर.

  • वेळ : सकाळी ९.३० वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

महाराष्ट्रातील रस्ते की मृत्यूचा सापळा? ६ वर्षात अपघातात ९५,७२२ जणांनी गमावला जीव, सर्वाधिक मृत्यू कोणत्या जिल्ह्यात?