श्रीलंकेचा प्रहार, भारताचा पलटवार! चौथ्या दिवसअखेर यजमानांची ६ बाद २२९ अशी स्थिती; तूर्तास फक्त १६ धावांची आघाडी X| BCCI
क्रीडा

श्रीलंकेचा प्रहार, भारताचा पलटवार! चौथ्या दिवसअखेर यजमानांची ६ बाद २२९ अशी स्थिती; तूर्तास फक्त १६ धावांची आघाडी

फॉलोऑनला सामोरे गेल्यावर श्रीलंकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात कडवा प्रहार केला. मात्र अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पलटवार करून पुन्हा एकदा लढतीवर पकड मिळवली. उभय संघांतील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने ७२.४ षटकांत ६ बाद २२९ धावांपर्यंत मजल मारली असून त्यांच्याकडे दुसऱ्या डावात फक्त १६ धावांची आघाडी आहे.

Mayuri Gawade

कोलंबो : फॉलोऑनला सामोरे गेल्यावर श्रीलंकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात कडवा प्रहार केला. मात्र अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पलटवार करून पुन्हा एकदा लढतीवर पकड मिळवली. उभय संघांतील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने ७२.४ षटकांत ६ बाद २२९ धावांपर्यंत मजल मारली असून त्यांच्याकडे दुसऱ्या डावात फक्त १६ धावांची आघाडी आहे.

कोलंबोतील सिंहालीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत श्रीलंकेचा पहिला डाव ८९.४ षटकांत २९० धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावात ५०३ धावांचा डोंगर उभारणाऱ्या भारताने २१३ धावांची आघाडी मिळवली. अपेक्षेप्रमाणे कर्णधार शुभमन गिलने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. परंतु दुसऱ्या डावात पसिंदू सूर्याबंदारा (१७३ चेंडूंत ९२ धावा) आणि कामिंदू मेंडिस (९२ चेंडूंत ५५ धावा) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. श्रीलंकेने तिसऱ्या सत्रापर्यंत भारतावर आघाडी घेतली होती. ३ बाद २०९ अशी स्थिती असताना मात्र पुढील २० धावांत त्यांनी ३ बळी गमावले. फिरकीपटू मानव सुथारने यांपैकी २ बळी मिळवले.

आता दिवसअखेर पहिल्या डावातील शतकवीर सोनल दिनुषा ७, तर फिरकीपटू केशरा नुवांथा ३ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे गुरुवारी पाचव्या दिवशी भारताचे गोलंदाज उर्वरित बळी किती लवकर मिळवून विजयी लक्ष्य गाठणार, हे पाहणे रंजक ठरेल. तर श्रीलंकेचा संघ अधिकाधिळ काळ खेळपट्टीवर ठाण मांडून भारतावरील आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल. पावसाची भूमिकादेखील पाचव्या दिवशी निर्णायक ठरणार असल्याने एकूणच कसोटी रंगतदार वळणावर आहे.

दरम्यान, भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघांतील पहिल्या कसोटीत भारताने १६५ धावांच्या फरकाने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे भारताला आता मालिकेत २-० असे निर्भेळ यश (क्लीन स्वीप) संपादन करण्याची संधी आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित ८ लढतींमध्ये चमकदार कामगिरी करणे गरजेचे आहे. पहिल्या कसोटीतील विजयानंतर भारताची टक्केवारी ५३.३३ इतकी असून ते सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलिया (८०), दक्षिण आफ्रिका (७५), न्यूझीलंड (७२.२२), बांगलादेश (५५.५६) हे चार संघ भारतापुढे आहेत. भारत २०२१ व २०२३मध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. दोन्ही वेळेस भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र २०२५मध्ये भारताला ती कामगिरी जमली नाही. त्यामुळे भारत अद्याप पहिल्या डब्ल्यूटीसी जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.

तत्पूर्वी, मंगळवारच्या ८ बाद २६५ धावांवरून पुढे खेळताना श्रीलंकेला फॉलोऑन टाळण्यासाठी बुधवारी आणखी ३९ धावा करायच्या होत्या. २५ वर्षीय डावखुरा फलंदाज सोनल दिनुषाने मालिकेतील दुसरे शतक साकारताना ८ चौकार व ३ षटकार लगावले. तो आणि लाहिरू कुमारा यांची जोडी श्रीलंकेला फॉलोऑनपासून वाचवणार, असेच दिसत होते. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ५८ धावांची भर देखील घातली. अखेरीस पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या ऑफस्पिनर सारांश जैनने कारकीर्दीतील पहिला बळी मिळवताना लाहिरूला (१२) बाद करून ही जोडी फोडली. मग दोन षटकांच्या अंतरात सारांशनेच दिनुषाचाही (१०३) अडसर दूर करून श्रीलंकेचा पहिला डाव ८९.४ षटकांत २९० धावांत संपुष्टात आणला. पहिल्या डावात सुथार, प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी ३, तर सारांशने २ बळी मिळवले. २१३ धावांची आघाडी घेतल्याने भारताने मग श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. आता पाचव्या दिवसाकडे लक्ष लागून असून गोलंदाजांची कामगिरी मोलाची असेल.

कसोटीतही फ्री-हिटचा नियम असावा : बहुतूले

  • श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंकडून वारंवार पडणारे नो-बॉल ही चिंतेची बाब असल्याचे भारतीय संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सईराज बहुतुले यांनी स्पष्ट केले. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी कसोटी क्रिकेटमध्येही फ्री-हिटचा नियम लागू करण्याची मजेशीर संकल्पना मांडली.

  • दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी आतापर्यंत तब्बल १० नो-बॉल टाकले आहेत. २०२१ नंतर एकाच कसोटीत फिरकीपटूंनी टाकलेली ही सर्वाधिक नो-बॉलची संख्या असून, या यादीत १४ नो-बॉलसह अफगाणिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे.

  • “नो-बॉलची समस्या सोडवण्यासाठी संघ सातत्याने काम करत आहे. कठीण परिस्थितीत बळी मिळवण्याचा प्रयत्न करताना किंवा अतिरिक्त जोर लावताना गोलंदाजाचा पाय रेषेबाहेर जाण्याची शक्यता असते, पण ही कोणतीही सबब ठरू शकत नाही. नियम बदलणे आपल्या हातात नसले तरी फ्री-हिटचा नियम आल्यास नो-बॉलचे प्रमाण कमी होईल, कारण कोणताही संघ अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त चेंडू देणे पसंत करणार नाही,” असे बहुतूले म्हणाले.

पावसामुळे ९ षटके वाया

बुधवारी पावसामुळे ९ षटकांचा खेळ वाया गेला. दिवसभरात ८१ षटकांचा खेळ शक्य झाला. भारतीय वेळेनुसार ५ वाजेपर्यंत खेळ सुरू राहणे अपेक्षित होते. मात्र ७३व्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर पावसाचे आगमन झाले व त्यानंतर खेळ सुरू करणे शक्य नसल्याने पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केले. आता गुरुवारी पाचव्या दिवशी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने सामन्यात कोणताही निकाल लागू शकतो. सोमवार आणि मंगळवारच्या दिवसांत मिळून ४० षटकांचा खेळ वाया गेला. दुसऱ्या दिवशी फक्त ५६ षटकांचा खेळ झाला होता, तर मंगळवारी ८० षटकेच टाकण्यात आली होती. आता पाचव्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होणे अपेक्षित आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९ बाद ५०३ डाव घोषित (देवदत्त पडिक्कल ११७, ध्रुव जुरेल नाबाद ११५; असिथा फर्नांडो ४/१०६)

श्रीलंका (पहिला डाव) : ८९.४ षटकांत सर्व बाद २९० (सोनल दिनुषा १०३; प्रसिध कृष्णा ३/५२, मानव सुथार ३/८५)

श्रीलंका (दुसरा डाव) : ७२.४ षटकांत ६ बाद २२९ (पसिंदू सूर्याबंदारा ९२, कामिंदू मेंडिस ५५; मानव सुथार २/८१)

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

MPSC Paper Leak: तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत; अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

बिलाचे २ कोटी थकवले, सरकारी कंत्राटदाराची आत्महत्या; जबाबदार अधिकाऱ्यावर आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन

इराण युद्धामुळे ही व्यक्ती बनली अब्जाधीश