शफालीमुळे भारतीय महिलांची आघाडी Photo- X (@TheShafaliVerma)
क्रीडा

भारत-श्रीलंका टी-२० मालिका: शफालीमुळे भारतीय महिलांची आघाडी

युवा सलामीवीर शफाली वर्माने (३४ चेंडूंत नाबाद ६९ धावा) साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी व ४९ चेंडू राखून फडशा पाडला.

Swapnil S

विशाखापट्टणम : युवा सलामीवीर शफाली वर्माने (३४ चेंडूंत नाबाद ६९ धावा) साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी व ४९ चेंडू राखून फडशा पाडला. याबरोबरच भारताने पाच लढतींच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

विशाखापट्टणमच्या राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत फक्त ९ बाद १२८ धावांपर्यंत मजल मारली. श्री चरणी (२३ धावांत २ बळी) व वैष्णवी शर्मा (३२ धावांत २ बळी) या डावखुऱ्या फिरकीपटूंनी प्रभावी गोलंदाजी केली. कर्णधार चामरी अटापटूने श्रीलंकेकडून सर्वाधिक ३१ धावा केल्या.

त्यानंतर भारताने ११.५ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. स्मृती मानधना (१४) स्वस्तात बाद झाली. मात्र शफाली व जेमिमा रॉड्रिग्ज (२६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. शफालीने ११ चौकार व १ षटकारासह टी-२०तील १२वे अर्धशतक साकारले. कर्णधार हरमनप्रीत कौर (१०) छाप पाडू शकली नाही. मात्र रिचा घोषच्या साथीने शफालीने १२व्या षटकात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शुक्रवारी तिरुवनंतपुरम येथे तिसरी लढत खेळवण्यात येईल.

२ नोव्हेंबर रोजी विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघ दीड महिना विश्रांतीवर होता. काही दिवसांपूर्वी बहुतांश खेळाडू एका खेळाडूच्या खासगी कार्यक्रमातही एकत्रित दिसले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महिला संघाची भेट घेत त्यांचे कौतुक केले. एकूणच महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले असून हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे.

आता अमोल मुझुमदार यांच्या प्रशिक्षणातील हा महिला संघ पुन्हा क्रिकेटकडे वळला आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताचे २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत पाच टी-२० सामने होणार आहेत. त्यानंतर ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व रंगणार आहे. मग भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत हा दौरा असेल. पुढील वर्षी जूनमध्ये महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे आता महिला संघाचे लक्ष अधिकाधिक टी-२० सामने खेळण्यावर असेल.

Thane : निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...