क्रीडा

आता लक्ष कसोटी मालिकेकडे; गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आजपासून वेस्ट इंडिजशी पहिला सामना

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. त्यामुळे भारताकडून यावेळी कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

Swapnil S

अहमदाबाद : आशिया चषकातील संस्मरणीय कामगिरीनंतर भारतीय संघ आता कसोटी क्रिकेटकडे वळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघ गुरुवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघांत पहिला सामना खेळवण्यात येईल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या कसोटी संघाचा भाग असलेले गिल, चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व अष्टपैलू अक्षर पटेल हे आशिया चषक खेळून आता लगेचच कसोटीच्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या शारिरीक तंदुरुस्तीचाही या मालिकेत कस लागेल. भारतीय कसोटी संघात एकूण १५ जणांचा समावेश आहे. अनुक्रमे अहमदाबाद (२ ते ६ ऑक्टोबर) व दिल्ली (१० ते १४ ऑक्टोबर) येथे उभय संघांत दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील.

गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्या मालिकेत ३१ वर्षीय बुमरा तीनच सामने खेळला होता. जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेली पाठदुखी व वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव बुमराला सामन्यांची योग्य निवड करण्याचे सुचवण्यात आले आहे. त्यामुळे आधी २८ तारखेनंतर आशिया चषकाची अंतिम फेरी खेळल्यावर बुमरा लगेच कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल का, याविषयी शंका होती. मात्र बुमराने स्वत:च आपण या मालिकेत खेळू, असे बीसीसीआयला कळवले. त्यामुळे तो, सिराज व प्रसिध कृष्णा विंडीजविरुद्ध भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा वाहतील.

वेस्ट इंडिजचा संघ रॉस्टन चेसच्या नेतृत्वात खेळत आहे. माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा टेगनारायण हा २०२४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी खेळला आहे. २९ वर्षीय टेगनारायणने १० कसोटींमध्ये १ शतकासह फक्त ५६० धावा केल्या आहेत. अनुभवी क्रेग ब्रेथवेटला मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध जुलैमध्ये झालेल्या मालिकेतील कामगिरीमुळे संघातून काढण्यात आले. दोन सामन्यांतील चार डावांत तो एकदाही १० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. त्याशिवाय शामर जोसेफ व अल्झारी जोसेफ दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्याने विंडीजची गोलंदाजी कमकुवत वाटत आहे. अशा स्थितीत ते भारताला कसे आव्हान देणार, याकडे लक्ष असेल.

दरम्यान, या लढतीसाठी वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघ तीन फिरकीपटूंना संधी देणार की बुमरा, सिराजसह नितीश रेड्डीच्या स्वरुपात मध्यमगती अष्टपैलू खेळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. त्यामुळे भारताकडून यावेळी कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

तिसऱ्या स्थानासाठी सुदर्शन-पडिक्कलमध्ये द्वंद्व

३३ वर्षीय करुण नायरने भारतीय संघातील स्थान गमावले आहे. जवळपास ९ वर्षांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या कर्नाटकच्या करुणने इंग्लंड दौऱ्यातील चार सामन्यांत एका अर्धशतकासह फक्त २०५ धावा केल्या. त्यामुळेच त्याच्या जागी कर्नाटकचाच २५ वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला संघात स्थान देण्यात आले आहे. पडिक्कलने नुकताच सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही दमदार शतक झळकावले होते. पडिक्कलला फक्त दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असून मार्च २०२४मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळला. पडिक्कल संघात परतला असला तरी, तिसऱ्या क्रमांकासाठी डावखुऱ्या साई सुदर्शनला प्रथम पसंती दिली जाईल, असे दिसते. सुदर्शनने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटींमध्ये एका अर्धशतकासह एकूण १४० धावा केल्या. मात्र वय ही त्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्यामुळेच ३३ वर्षीय करुणऐवजी २३ वर्षीय सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे.

फिरकीपटूंची कामगिरी ठरणार निर्णायक

२७ वर्षीय पंतला इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना उजव्या पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली. त्यामुळे पंत आता कसोटी मालिकेलाही मुकणार आहे. त्यामुळेच ३६ वर्षीय जडेजाकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. प्रदीर्घ कारकीर्दीत जडेजा प्रथमच कसोटी संघाचा उपकर्णधार असेल. रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर जडेजावर भारताच्या फिरकीची भिस्त असेल. त्याला कुलदीप यादव, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर या अन्य फिरकीपटूंची साथ लाभेल. फलंदाजीत गिलसह के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल यांच्यावर प्रामुख्याने भारतीच मदार असेल. अष्टपैलूंचे योगदान मालिकेत मोलाचे ठरेल.

उभय संघांत आतापर्यंत १०० कसोटी सामने झाले आहेत. त्यांपैकी भारताने २३, तर विंडीजने ३० लढती जिंकल्या आहेत. ४७ लढती अनिर्णित आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

-भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, नितीश रेड्डी, नारायण जगदीशन, प्रसिध कृष्णा.

-वेस्ट इंडिज : रॉस्टन चेस (कर्णधार), टेगनारायण चंद्रपॉल, ब्रँडन किंग, केव्हलॉन अँडरसन, शाय होप, जोमेल वॉरिकन, जॉन कॅम्पबेल, अलिक अथांझे, टेव्हिन एमलाच, जस्टिन ग्रीव्हस, अँडरसन फिलिप, जेडन सील्स, खैरी पेरी, जॉन लेन, जेदिया ब्लेड्स.

वेळ : सकाळी ९.३० वाजता g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल