ब्रिस्बेन : यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा भारताने काढला. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत कांगारूंना धूळ चारत भारताने मालिका खिशात घातली. शनिवारी अखेरचा सामना रद्द झाला असला तरी ही मालिका भारताने २-१ ने जिंकली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर अभिषेक शर्मा (१३ चेंडूंत नाबाद २३ धावा) आणि शुभमन गिल (१६ चेंडूंत नाबाद २९ धावा) यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फटकावले. भारतीय संघ ४.५ षटकांत ५२ धावांवर असताना खेळत कडकडाटामुळे थांबवण्यात आला. विजेच्या सामना त्यानंतर मुसळधार पावसाने गाबाच्या खेळपट्टीवर जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
पहिल्याच षटकात चुकीचा फटका मारताना अभिषेक शर्माचा उडालेला झेल ग्लेन मॅक्सवेलने सोडला. त्यानंतर बेन द्वारशुईसने चौथ्या षटकात एक सोपा झेल सोडला. त्यावेळी अभिषेक ११ धावांवर खेळत होता.
दरम्यान विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला बाद करण्याची संधी ऑस्ट्रेलियाकडे होती. परंतु त्यांनी ती गमावली. त्यानंतर अभिषेकने भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. त्याने मिड विकेटवरून एक अफलातून फ्लॅट षटकार लगावला.
दरम्यान, शुभमन गिलने द्वारशुईसवर जोरदार प्रहार केला. तिसऱ्या षटकात त्याच्या गोलंदाजीवर गिलने तीन चौकार लगावले. मालिकेतील पहिला सामना देखील पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून जिंकला होता. मात्र, भारताने तिसरा सामना पाच गडी राखून आणि चौथा सामना तब्बल ४८ धावांनी जिंकत मालिकेत शानदार पुनरागमन केले.
अभिषेक-गिलमधील समन्वय अप्रतिम सूर्यकुमार यादव
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजी करतात तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो, असे भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला. शनिवारी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकारांशी संवाद साधला. सूर्यकुमार म्हणाला की, जेव्हा अभिषेक आणि शुभमन सलामीला फलंदाजी करतात तेव्हा त्यांच्यातील समन्वय अप्रतिम असतो. तसेच त्यांना असलेली समज हीच त्यांची ताकद आहे. ते दोघे परिस्थिती ओळखतात. 'पॉवर प्ले'मध्ये जोखीम न घेता खेळतात आणि नंतर धावांची गती वाढवतात, असे सूर्या म्हणाला.
ऑस्ट्रेलियातील वातावरणात खेळण्यासाठी कसून तयारी केली - अभिषेक शर्मा
ऑस्ट्रेलियाचे आव्हान पेलावण्यासाठी भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने महिनाभर मानसिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या तयारी केली होती. त्याचा फायदा त्याला या मालिकेत झाला. भारताच्या या युवा सलामीवीराला 'प्लेअर ऑफ द सिरीज' पारितोषिकाने गौरविण्यात आले. भारताच्या या आक्रमक सलामीवीराने आपल्या फलंदाजीने प्रभावीत केले. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्या आणि दर्जेदार वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळण्याची अभिषेकची बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती, असे २४ वर्षीय अभिषेक म्हणाला. ५ सामन्यांच्या या मालिकेत त्याने १६३ धावा जमवल्या. मालिकेतील २ सामने पावसामुळे रद्द झाले. या मालिकेची मी फार वाट पाहत होतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० मालिका खेळायची आहे हे कळल्यावर मी फारच उत्सुक झालो होतो, असे मालिका विजयानंतर अभिषेक म्हणाला. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या फलंदाजांना अनुकूल आहेत. परंतु जगातील सर्वात दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीचा अभ्यास करायला हवा, असे अभिषेक म्हणाला.