नवी मुंबई : भारतीय महिला संघाने गुरुवारी ऐतिहासिक पराक्रम केला. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (१३४ चेंडूंत नाबाद १२७ धावा) साकारलेल्या झुंजार शतकाला कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (८८ चेंडूंत ८९ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारतीय संघाने बलाढ्य व गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५ गडी आणि ९ चेंडू राखून पराभव करत महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारताने महिला क्रिकेटच्या इतिहासातील विक्रमी धावसंख्येचा पाठलागही केला.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३८ धावांचे लक्ष्य भारताने ४८.३ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. १४ चौकारांच्या साथीने जेमिमाने १३४ चेंडूंत १२७ धावा फटकावताना कारकीर्दीतील तिसरे शतक साकारले. तिला २-३ वेळा जीवदानही लाभले. या सर्वांचा जेमिमाने सुरेख लाभ घेतला. हरमनसह तिने तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी रचून पायाभरणी केली. मग दीप्ती शर्मा (१७ चेंडूंत २४) व रिचा घोष (१६ चेंडूंत २६) यांनी उपयुक्त योगदान दिले. अखेरीस अमनजोत कौरने (८ चेंडूंत नाबाद १५) ४९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजयी चौकार लगावला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. जेमिमाला यावेळी अश्रू अनावर झाले.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगत असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत झाले. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत झाल्या. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले असून भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती.
भारताने या स्पर्धेत श्रीलंका व पाकिस्तान यांना नमवून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन बलाढ्य संघांकडून भारताला पराभव पत्करावा लागला. त्यातही आफ्रिका व इंग्लंडविरुद्धचा पराभव अधिक जिव्हारी लागणारा ठरला, कारण एकवेळ भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. त्यामुळे चाहत्यांकडून होणारी टीका व अपेक्षांचे दडपण झेलून भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी केली व उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. भारताचा बांगलादेशविरुद्धचा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला. भारताने ७ सामन्यांतील ७ गुणांसह (३ विजय, ३ पराभव, १ रद्द लढत) चौथे स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती.
यापूर्वी २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारतानेच ऑस्ट्रेलियाला अखेरचे नमवले होते. आता ८ वर्षांनी भारताने पुन्हा एकदा तो पराक्रम करून दाखवला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ४९.५ षटकांत सर्व बाद ३३८ (फीबी लिचफिल्ड ११९, एलिस पेरी ७७; श्री चरिणी २/४९) पराभूत वि. भारत : ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ (जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद १२७, हरमनप्रीत कौर ८९, रिचा घोष नाबाद २६; किम गार्थ २/४६)
सामनावीर : जेमिमा रॉड्रिग्ज