क्रीडा

भारत-इंग्लंड महिला कसोटी : भारतीय महिला संघाचे इंग्लंडमधील वर्चस्व अबाधित

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर प्रथमच महिलांचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. या लढतीत भारताने यजमान इंग्लंडचा २७० धावांनी धुव्वा उडवला.

Swapnil S

लॉर्ड्स : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर प्रथमच महिलांचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. या लढतीत भारताने यजमान इंग्लंडचा २७० धावांनी धुव्वा उडवला. मुख्य म्हणजे भारताने इंग्लंडमध्ये आजवर एकही कसोटी गमावलेली नाही, हे विशेष. इंग्लंडमधील १० कसोटी सामन्यांत भारताने ३ विजय मिळवले, तर ७ लढती अनिर्णित राखल्या आहेत.

१४२ वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर पुरुषांचा पहिला क्रिकेट सामना झाला होता. त्यानंतर जुलै १९७६मध्ये येथे महिलांचे मर्यादीत षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास सुरुवात झाली. मात्र लॉर्ड्सवर महिलांच्या कसोटी सामन्यांना डावलले जायचे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिलांचा ॲशेस सामनादेखील आजवर कधी लॉर्ड्सवर झाला नाही. अखेरीस १९७६मधील लॉर्ड्सवरच झालेल्या महिलांच्या त्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त यंदा येथे कसोटी सामना खेळवण्यात आला. भारतीय महिलांना या लढतीत खेळण्याची संधी मिळाली. या लढतीनिमित्त इंग्लंडच्या ५० माजी महिला क्रिकेटपटूंचा गौरवदेखील करण्यात आला.

दरम्यान, सोमवारी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव ६२.५ षटकांत १८६ धावांत गुंडाळला. फिरकीपटू स्नेह राणाने ४, तर दीप्ती शर्मा, क्रांती गौड व सायली सातघरेने प्रत्येकी २ बळी मिळवले. पहिल्या डावात भारताने २८५ धावा केल्यावर क्रांतीच्या पाच बळींमुळे इंग्लंडला १७० धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मग यास्तिका भाटियाच्या शतकामुळे भारताने ३४१ धावांचा डोंगर उभारून इंग्लंडपुढे विजयासाठी ४५७ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने अर्धशतकी खेळी करत कडवी झुंज दिली, परंतु ती इंग्लंडचा पराभव टाळू शकली नाही. पहिल्या डावात पाच बळी घेणऱ्या क्रांतीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

हरमनप्रीतने शतकी खेळी करणाऱ्या यास्तिकाची संघात निवड केल्याबद्दल तिने निवड समितीचेही कौतुक केले. तसेच सांघिक कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला. टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर संघाने ही मुसंडी मारली आहे. मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे हरमनप्रीतने नमूद केले. सहाय्यक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना खेळपट्टीवरील बदलांचा अंदाज घेणे सोपे झाले, असे ती म्हणाली.

भारताने दिलेल्या ४५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या १३० धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज ९० मिनिटांपेक्षा जास्त काळ तग धरू शकले नाहीत. इंग्लंडची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज एमी जोन्स ५४ धावांवर खेळत असताना स्नेह राणाने तिला बाद करत भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यानंतर सोफी एक्लेस्टोन हिने इस्सी वाँगसोबत काही काळ प्रतिकार केला, परंतु दीप्ती शर्माने लॉरेन बेल आणि वाँग यांना लागोपाठ बाद करत इंग्लंडची शेपूट गुंडाळली. स्नेह राणाने एक्लेस्टोनला बाद करताच भारतीय संघाने मैदानात आणि ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष केला.

या ऐतिहासिक विजयाचा पाया भारताच्या स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया यांनी रचला. यास्तिकाने तिसऱ्या दिवशी संस्मरणीय शतक झळकावले होते. तर गोलंदाजीत क्रांती गौड हिने पाच बळी घेत लॉर्ड्सच्या मानद फलकावर आपले नाव कोरले. वेगवान गोलंदाज गौड आणि सायली यांनी खेळपट्टीवरील उताराचा प्रभावी वापर करत इंग्लंडच्या गोलंदाजांपेक्षा सरस कामगिरी केली, तर ऑफस्पिनर राणानेही दबाव कायम ठेवला.

सचिनचे मार्गदर्शन; हरमनप्रीतची आघाडी

या मोठ्या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील आपले वर्चस्व कायम राखले आहे. दोन्ही संघांमधील १६ कसोटी सामन्यांपैकी भारताने चार सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला केवळ एकच सामना जिंकता आला असून ११ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताचा इंग्लंडविरुद्ध एकमेव पराभव १९९५ मध्ये झाला होता.

त्याशिवाय हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताने पाचपैकी चौथी कसोटी जिंकली. याबरोबरच तिने भारतासाठी कसोटीत सर्वाधिक यशस्वी कर्णधार होण्याचा विक्रम रचताना मिताली राजला (३ विजय) पिछाडीवर टाकले.

सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला मार्गदर्शन केले होते. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनीही तेंडुलकरसोबत स्टेडियममधून सामन्याचा आनंद घेतला. सामना संपल्यानंतर तेंडुलकरने खेळाडूंची भेट घेत हस्तांदोलन केले. इंग्लंडची टॅमी ब्युमाँट आणि माजी कर्णधार हेदर नाईट यांचा हा शेवटचा सामना ठरला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाढत्या अन्नधान्याच्या किमतीचा सामान्यांना फटका

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ९२ लाख 'बहिणीं'ना वगळल्याने नवा वाद

जलतरणपटू गीताने केली 'इंग्लिश खाडी' पार

दोन्ही राष्ट्रवादीत अस्वस्थता; सुनेत्रा पवार गटाला कुरबुरींचे, तर शरद पवार गटाला फुटीचे ग्रहण?

होर्मुझमध्ये पुन्हा नाकेबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा