अहमदाबाद : भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाने कारकीर्दीतील विक्रमी आठवे शतक झळकावताना १२२ चेंडूंत १०० धावा फटकावल्या. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत नाबाद ५९ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला ६ गडी व ३४ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच भारताने मालिकेत २-१ असे यश संपादन करून चाहत्यांना दिवाळीचे बोनस गिफ्ट दिले.
स्मृतीचे विक्रमी शतक
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या निर्णायक लढतीत न्यूझीलंडने दिलेले २३३ धावांचे लक्ष्य भारताने ४४.२ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत स्मृतीने अग्रस्थान पटकावताना मिताली राजला (७ शतके) मागे टाकले. स्मृतीच सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
तीन लढतींमध्ये ५६ धावा करण्यासह ६ बळी मिळवणाऱ्या दीप्ती शर्माला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एकीकडे भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमवावी लागली. मात्र महिलांनी किमान एकदिवसीय प्रकारात मालिका जिंकून चाहत्यांना दिलासा दिला.
उभय संघांतील एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत होती. भारताने पहिली, तर न्यूझीलंडने दुसरी लढत जिंकल्याने तिसऱ्या निर्णायक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र रेणुका सिंग व साइमा ठाकोर यांच्या वेगवान जोडीने टिच्चून मारा केला. त्यातच सुझी बेट्स ४ धावांवर धावचीत झाली. त्यानंतर कारकीर्दीतील दुसराच सामना खेळणाऱ्या फिरकीपटू प्रिया मिश्राने कर्णधार सोफी डिवाईन (९) व जॉर्जिया प्लिमर (३९) यांचे महत्त्वाचे बळी मिळवले. साइमाने लॉरेन डाऊनचा (१) अडसर दूर केला.
५ बाद ८८ अशी स्थिती असताना ब्रूक हालिडेने मॅडी ग्रीनच्या साथीने संघाला सावरले. ब्रूकने ९ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. ऑफस्पिनर दीप्तीने ब्रूकला बाद केले. मग इजाबेल गेझ (२५) व हॅना रोवला (११) तिने माघारी पाठवले. तर ग्रीन १५ धावांवर धावबाद झाली. त्यामुळे ४९.५ षटकांत न्यूझीलंडचा संघ २३२ धावांत गारद झाला. ३ बळी मिळवणाऱ्या दीप्तीला प्रियाने २, तर साइमा व रेणुकाने १ बळी घेत चांगली साथ दिली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शफाली वर्माला (१२) स्वस्तात गमावले. मात्र त्यानंतर स्मृतीने जबाबदारी घेत न्यूझीलंडवर हल्लाबोल केला. पहिल्या दोन लढतींमध्ये अनुक्रमे ५ व० धावा करणाऱ्या स्मृतीने यावेळी सर्व कसर भरून काढताना १० चौकारांसह ८वे शतक साकारले. तानिया भाटियासह तिने दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. तानिया ३५ धावांवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत व स्मृती या कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीने संघाला विजयासमीप नेले. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी रचली.
स्मृती १०० धावांवर बाद झाली. हरमनप्रीतने मात्र ६ चौकारांसह २०वे अर्धशतक साकारले. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने झटपट १८ चेंडूंत २२ धावा केल्या. मात्र जिंकण्यासाठी १ धाव आवश्यक असताना ती बाद झाली. अखेर हरमनप्रीतने ४५व्या षटकात चौकार लगावून भारताच्या मालिका विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. आता भारतीय महिला संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ५ डिसेंबरपासून हा दौरा सुरू होईल.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : ४९.५ षटकांत सर्व बाद २३२ (ब्रूक हालिडे ८६, जॉर्जिया प्लिमर ३९: प्रिया मिश्रा २/४१, दीप्ती शर्मा ३/३९) पराभूत वि. भारत: ४४.२ षटकांत ४ बाद २३६ (स्मृती मानधना १००, हरमनप्रीत कौर नाबाद ५९, यास्तिका भाटिया ३५: हॅना रोव २/४७) सामनावीर : स्मृती मानधना
- मालिकावीर : दीप्ती शर्मा