तिरुवनंतपुरम : भारतीय महिला संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत श्रीलंकेविरुद्धचे चार टी-२० सामने जिंकले आहेत. आता मंगळवारी होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून व्हाइटवॉश देण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले आहे.
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये जून-जुलैमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी तयारी म्हणून ही मालिका भारतीय महिला संघासाठी महत्त्वपूर्ण समजली जात आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. २०२४च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत गटसाखळीतच बाहेर पडावे लागल्यानंतर भारतीय संघाने आपल्या खेळात अधिक आक्रमकता आणली आहे. त्यामुळेच यावर्षी दोन मालिका भारताला जिंकता आल्या. “ही मालिका आमच्यासाठी खूपच चांगली ठरली आहे. विश्वचषक स्पर्धेआधी आम्ही आमच्या रणनीतीत तसेच खेळात सुधारणा करण्याचा निर्णय केला होता. त्यानुसार आम्ही आमच्या खेळाचा दर्जा सुधारण्याचा तसेच टी-२०मध्ये आक्रमकपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे,” असे भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सांगितले.
श्रीलंकिविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर सलामीवीर शफाली वर्मा हीसुद्धा तितकीच प्रभावी ठरली आहे. क्षेत्ररक्षण ही भारतासाठी अद्याप कमकुवत बाजू ठरली आहे. भारताने गेल्या सामन्यात दोन झेल सोडले तसेच दोन यष्टीरक्षणाच्या संधीही वाया घालवल्या. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर हिने एका वर्षाच्या कालावधीनंतर यशस्वी पुनरागमन केले आहे. बॅडपॅचमध्ये असलेली भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला सूर गवसला, ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष, जी, कामालिनी, श्री चरणी, वैष्णवी शर्मा.
श्रीलंका : चामरी अटापट्टू (कर्णधार), हासिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षिका डीसिल्व्हा, कविशा दिलहरी, इमेशा दुलानी, कौशिनी नथयंगना, मालशा शेहानी, इनोका रामावीरा, शाशिनी गिमहानी, निमेषा मधुशानी, काव्या काविंदी, रश्मिका सेवंदी, मालकी मदारा.