हांगझो (चीन): भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी जपान विरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राखत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे यजमान चीनने सुपर ४ स्टेजमधील अखेरच्या लढतीत कोरियाला १-० असे पराभूत करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर चीनचे आव्हान आहे. अंतिम सामना जिंकणारा संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या बेल्जियम आणि नेदरलँड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत थेट पात्र होणार आहे.
गतविजेत्या जपानविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघाला कोरीया आणि चीन यांच्यातील लढतीतील निकालावर अवलंबून राहावे लागले. चीनच्या संघाने आधीच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र या सामन्यातील निकाल भारताचे भवितव्य ठरवणार होता. कोरियाने किमान २ गोलच्या फरकाने चीनला पराभूत केले असते तर ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असते. परंतु चीनने कोरियाला १-० असे पराभूत केल्याने भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. २०२२ च्या हंगामातील तिसरा क्रमांक पटकावलेला भारतीय संघ आता विजेतेपदासाठी रविवारी मैदानात उतरणार आहे.
जपानविरुद्ध भारताने सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली आणि सातव्या मिनिटाला ब्युटी डुंग डुंग हिने प्रतिस्पर्धी संघाची गोलपोस्ट भेदत भारतीय गोटात आनंद पसरवला. भारताचा हा आनंद काही काळ टिकून होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात गोल करत जपानने सामन्यात पुनरागमन केले. ५८व्या मिनिटाला कोबायाकावा शिहो हिने गोल करत जपानला बरोबरी साधून दिली. अखेरपर्यंत ही बरोबरी कायम राहिली.
सामना जसजसा पुढे जात होता तसे भारताने पुन्हा चेंडूवर नियंत्रण मिळवत आक्रमण सुरू केले. जपानने चांगला बचाव करत शेवटच्या टप्प्यात भारतावर दबाव आणला. शेवटच्या सत्रात जपानने आक्रमण वाढवले. अखेर ५८व्या मिनिटाला जपानने बरोबरी साधली.
गटातील तिन्ही सामने जिंकत चीनने आपले वर्चस्व दाखवले आहे. अंतिम सामन्यात रविवारी भारतासमोर तगड्या चीनचे आव्हान आहे. या लढतीत गत सामन्यातील चुका सुधारून भारताला चीनला रोखावे लागणार आहे.
असे आहे गुणफलक
सुपर ४ स्टेजमध्ये चीनने सलग तीन विजयांसह एकूण नऊ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. भारताने ३ पैकी एका सामन्यात विजय, एक पराभव आणि एका लढतीत बरोबरी राखली. त्यामुळे ४ गुणांसह ते दुसऱ्या स्थानी आहेत. कोरियाला केवळ एक गुण मिळाला. कारण त्यांनी खेळलेल्या ३ सामन्यांत २ पराभव आणि एक सामना बरोबरीत राखला. जपानचा संघ दोन बरोबरी आणि एक पराभवासह तिसऱ्या स्थानावर राहिला.