बंगळुरू : गेल्या २-३ वर्षांचा काळ आपल्या सर्वांचीच कसोटी पाहणारा ठरला. परंतु यादरम्यानही काही खऱ्या फुटबॉलप्रेमींनी आम्हाला पाठिंबा देणे कधीच थांबवले नाही. आमचे हे यश त्यांनाच समर्पित आहे, असे भावोद्गार भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.
छेत्रीच्या भारतीय संघाने मंगळवारी विक्रमी नवव्यांदा सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत भारताने कुवैतवर पेनल्टी शूटआऊटमध्ये सरशी साधली. भारताचे या वर्षातील एकदंर तिसरे जेतेपद ठरले. सामना जिंकल्यानंतर छेत्रीसह संपूर्ण भारतीय संघाने बंगळुरूच्या श्री कांतीरव स्टेडियममध्ये जमलेल्या चाहत्यांचे आभार मानले. त्याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू व सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर छेत्रीने खास प्रतिक्रिया व्यक्त केली.
“भारतीय फुटबॉल संघ सध्या वेगळ्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या संघातील प्रत्येक खेळाडू एक स्वप्न डोळ्यांसमोर बाळगून आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, याची खात्री आहे. परंतु या प्रवासात चाहत्यांचे योगदान अमूल्य आहे. विशेषत: कोरोना काळात क्रीडा क्षेत्रावर अनेक निर्बंधे आल्यानंतरही काही चाहत्यांनी भारतीय फुटबॉल संघाला पाठिंबा दर्शवणे कमी केले नाही. किंबहुना गेल्या वर्षभरात त्यांचे नाते आमच्याशी अधिक घट्ट झाले,” असे ३८ वर्षीय छेत्री म्हणाला.
“पुरेसा वेळ आणि संधी मिळाली तर हा संघ काय करू शकतो, हे सर्वांनी पाहिले. ट्राय-नेशन स्पर्धा, आंतरखंडीय चषक व आता सॅफ चषक जिंकणे सोपे मुळीच नव्हते. पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेतही आम्ही कामगिरीत सातत्य राखू,” असे भारताचे प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच म्हणाले. १२ जानेवारीपासून एएफसी आशियाई चषक रंगणार असून या स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, सीरिया यांच्यासह ब-गटात समावेश करण्यात आला आहे.
चांग्टे, मनीषा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू
लालिअनझुला चांग्टे याची मंगळवारी २०२२-२३ या फुटबॉल हंगामातील सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. इंडियन सुपर लीगमध्ये मुंबई सिटी एफसीकडून खेळणाऱ्या या २६ वर्षीय मिझोरामच्या खेळाडूने भारतासाठीही तितकीच प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे एआयएफएफने त्याचा गौरव करण्याचे ठरवले आहे. त्याने या हंगामातील १२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत दोन गोल नोंदवताना आणखी दोन गोलसाठी सहाय्य केले. त्याशिवाय आयएसएलमध्ये मुंबईसाठी त्याने २२ लढतींमध्ये १० गोल केले. महिलांमध्ये मनीषा कल्याणने हा बहुमान पटकावला. पंजाबच्या २१ वर्षीय मनीषाने २०२०मध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कारही जिंकला होता.