बंगळुरू : श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत भारताच्या केंद्रीय करारातील आघाडीच्या क्रिकेटपटूंनी शनिवारी बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये हजेरी लावली. आगामी घरगुती मोसमाच्या पार्श्वभूमीवर या खेळाडूंना अनिवार्य फिटनेस चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.
तीन दिवस सतत मैदानावर राहिल्यानंतरही, पुढील आठ महिन्यांच्या प्रदीर्घ आणि कठीण हंगामापूर्वी खेळाडूंनी पूर्व-हंगाम फिटनेस निकष पूर्ण करण्यासाठी दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली. या फिटनेस चाचणीत अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, यष्टीरक्षक-फलंदाज रिषभपंत, सलामीवीर यशस्वी जयस्वाल या कसोटी संघातील नियमित खेळाडूंसह टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, संजू सॅमसन आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हे खेळाडू घाम गाळताना दिसले.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त घोषित झाल्यानंतरच या फिटनेस चाचण्यांना सामोरे जातील. सध्या हे खेळाडू पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहेत. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांना तुर्तास या चाचणीतून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटन दौऱ्यात स्नायूच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला प्रिन्स यादव आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून निवडीसाठी उपलब्ध आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) देशांतर्गत हंगाम दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होतो. यंदा नवी दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने या मोसमाची सुरुवात होईल. यानंतर भारताचा मुख्य टी-२० संघ जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होईल, तर त्याच वेळी पांढऱ्या चेंडूतील उर्वरित तज्ज्ञ खेळाडूंचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरगुती मालिकेत खेळेल. याशिवाय सप्टेंबरच्या शेवटच्या ऑक्टोबरच्या आठवड्यापासून दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुद्दुचेरी येथे 'इंडिया ए' आणि 'ऑस्ट्रेलिया ए' यांच्यात मालिका रंगणार आहे.
अशी पार पडली ब्राँको, यो-यो टेस्ट
या अनिवार्य चाचण्यांमध्ये 'ब्रॉन्को टेस्ट', २ किलोमीटरची धाव, 'यो-यो टेस्ट' आणि यष्टींमधील धाव यांसारख्या क्रिकेटशी संबंधित काही विशेष प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. ब्रॉन्को टेस्टमध्ये ०, २०, ४० आणि ६० मीटरवर असणाऱ्या कोन्सच्या आधारे सलग ५ संचांमध्ये १२०० मीटरचे अंतर ५.३० मिनिटांत पार करावे लागते. याशिवाय 'यो-यो टेस्ट 'साठी १६.५ चा निकष असून २ किमीची धाव १० मिनिटांच्या आत पूर्ण करावी लागते.