क्रीडा

बुद्धिबळात भारताचा दुहेरी धमाका! पुरुष आणि महिला संघाला चेस ऑलिम्पियाडचे पहिलेवहिले सुवर्णपदक

एकीकडे डी. गुकेश याने आव्हानवीराची म्हणजेच कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावल्यानंतर भारताच्या दोन्ही बुद्धिबळ संघांनी रविवारी नव्या अध्यायाची नोंद केली.

Swapnil S

बुडापेस्ट : एकीकडे डी. गुकेश याने आव्हानवीराची म्हणजेच कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावल्यानंतर भारताच्या दोन्ही बुद्धिबळ संघांनी रविवारी नव्या अध्यायाची नोंद केली. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना ‘चेकमेट’ करत रविवारी चेस ऑलिम्पियाडच्या पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.

डी. गुकेश, अर्जुन इरिगसी आणि आर. प्रज्ञानंद यांच्या विजयामुळे भारतीय पुरुष संघाने रविवारी ११व्या आणि अंतिम फेरीत स्लोव्हेनियाचा ३.५-०.५ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. त्याचबरोबर हरिका द्रोणावल्ली, दिव्या देशमुख, आर. वैशाली, वंतिका अगरवाल आणि तानिया सचदेव यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने अझरबैजानला ३.५-०.५ अशी धूळ चारत पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले. याआधी पुरुष संघाने २०१४ आणि २०२२मध्ये कांस्यपदक पटकावले होते. महिला संघाने चेन्नई येथे २०२२मध्ये झालेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली होती. २०२०मध्ये कोरोनाच्या काळात झालेल्या ऑनलाइन चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने रशियासह संयुक्तपणे सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यावेळी पुरुष आणि महिला खेळाडू एकत्रपणे खेळले होते.

वर्ल्ड चॅम्पियनशिपचा आव्हानवीर गुकेश आणि अर्जुन इरिगसी यांनी स्लोव्हेनियाविरुद्ध पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत भारताला खुल्या गटात पहिले जेतेपद निश्चित करून दिले होते. त्यानंतर प्रज्ञानंदनेही आपली लढत जिंकली. मात्र नाशिकच्या विदीत गुजराथीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारतीय पुरुष संघाने २२पैकी २१ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. फक्त उझबेकिस्तानविरुद्धची एकमेव लढत २-२ अशी बरोबरीत सोडवत भारताने एक गुण गमावला. उर्वरित सर्व प्रतिस्पर्ध्यांना भारतीय पुरुष संघाने धूळ चारली.

पुरुषांच्या सुवर्णपदकी कामगिरीनंतर भारतीय महिला संघानेही अझरबैजानचे आव्हान सहजपणे मोडीत काढत अग्रस्थानी येण्याचा मान पटकावला. द्रोणावल्ली हरिकाने तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या प्रतिस्पर्धीला नमवल्यानंतर नागपूरच्या दिव्या देशमुखनेही विजय मिळवला. वंतिका अगरवालने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर आर. वैशालीची उलविया फटालियेव्हाविरुद्धची लढत बरोबरीत सुटली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी