भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
क्रीडा

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे अध्यक्ष कालिकेश नारायण सिंह देव यांनी ही माहिती दिली. गुरुवारी रात्री दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय नेमबाजी क्षेत्रातील दिग्गज नेमबाज आणि माजी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे अध्यक्ष कालिकेश नारायण सिंह देव यांनी ही माहिती दिली. गुरुवारी रात्री दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय पिस्तूल नेमबाजांचे उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक (High-Performance Coach) म्हणून कार्यरत असलेले राणा नुकतेच जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेतून परतले होते. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र त्यांची प्रकृती सुधारली नाही.

हृदयविकाराच्या समस्येनंतर निधन

म्युनिक येथे झालेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेतून परतताना जसपाल राणा यांची प्रकृती बिघडली होती. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबंधित समस्येमुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पुढील काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचे निधन झाले.

भारतीय नेमबाजीतील मोठं नाव

जसपाल राणा हे भारतातील सर्वात यशस्वी नेमबाजांपैकी एक मानले जात होते. आशियाई क्रीडा स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी देशासाठी पदके जिंकली होती.

खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली. २०१२ मध्ये त्यांची कनिष्ठ राष्ट्रीय पिस्तूल प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ चौधरी, अनीश भानवाला, चिंकी यादव आणि ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर यांसारख्या अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले. युवा नेमबाजांना घडविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

फेब्रुवारी २०२५ मध्ये NRAI ने त्यांची २५ मीटर पिस्तूल प्रकारासाठी उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. भारतीय नेमबाजीतील योगदानासाठी केंद्र सरकारने २०२० मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले होते.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हे मोठे नुकसान असल्याचे म्हटले.

"जसपाल राणा यांचे निधन ही भारतीय क्रीडा विश्वासाठी मोठी हानी आहे. नेमबाज म्हणून त्यांनी देशाला गौरव मिळवून दिला. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक युवा खेळाडूंना घडवले. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील," असे मोदी यांनी म्हटले.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड