नवी मुंबई : कर्णधार स्मृती मानधना (४७ चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि युवा रिचा घोषने (२१ चेंडूंत ५४ धावा) झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला ६० धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने २०१९नंतर प्रथमच मायदेशात टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या २१८ धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाला २० षटकांत ९ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. राधा यादवने ४ बळी मिळवले.
तत्पूर्वी, स्मृतीने १३ चौकारांसह ३०वे, तर रिचाने ३ चौकार व ५ षटकारांसह दुसरे अर्धशतक साकारले. मुख्य म्हणजे रिचाने १८ चेंडूंतच अर्धशतक फटकावून टी-२०मध्ये सर्वात जलद अर्धशतक फटकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ३ बाद २१७ धावांचा डोंगर उभारला. भारताची ही टी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. रिचा सामनावीर ठरली. तर सलग ३ अर्धशतके झळकावणाऱ्या स्मृतीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
आता उभय संघांत बडोदा येथे ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. २२ तारखेपासून या मालिकेस प्रारंभ होईल.
संक्षिप्त धावफलक
g भारत : २० षटकांत ४ बाद २१७ (स्मृती मानधना ७७, रिचा घोष ५४, राघवी बिस्त नाबाद ३१; चिनले हेन्री १/१४) विजयी वि. g वेस्ट इंडिज : २० षटकांत ९ बाद १५७ (चिनले हेन्री ४३, डिएंड्रा डॉटिन २५; राधा यादव ४/२९)