टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच...गोलंदाजाने एकाच षटकात घेतल्या ५ विकेट Photo- X
क्रीडा

टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच...गोलंदाजाने एकाच षटकात घेतल्या ५ विकेट

जगातील अनेक खेळाडूंनी एका षटकात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. परंतु, एका षटकात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम आजवर कुणीच केला नव्हता.

Krantee V. Kale

इंडोनेशियाचा वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदानाने (Gede Priandana) टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एकाच षटकात ५ विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. २८ वर्षीय प्रियंदानाने कंबोडियाविरुद्ध ही मोठी कामगिरी केली. यापूर्वी जगातील अनेक खेळाडूंनी एका षटकात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. परंतु, एका षटकात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम आजवर कुणीच केला नव्हता. प्रियंदानाच्या या अलौकिक कामगिरीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवीन अध्याय लिहिला आहे.

५ विकेट्स घेत रचला इतिहास

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रियंदानाने त्याच्या पहिल्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर शाह अब्रार हुसेन, निर्मलजीत सिंग आणि चांथून रथनक यांना बाद करून हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर त्याने मोंगदारा सोक आणि पेल वेनाक यांना बाद करून एकाच षटकात ५ विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

सामन्यात इंडोनेशियाचे वर्चस्व

इंडोनेशिया आणि कंबोडिया यांच्या ८ सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ डिसेंबर रोजी बालीमध्ये खेळला गेला. कंबोडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत इंडोनेशियाने ५ बाद १६७ धावा केल्या. यावेळी, इंडोनेशियाकडून धर्म केसमाने ८ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची दमदार शतकी खेळी केली.

प्रत्युत्तरात, कंबोडियाने १४. ३ षटकांपर्यंत १०४ धावा केल्या होत्या. त्यानंतर, इंडोनेशियाकडून १६ वे षटक टाकण्यासाठी गेडे प्रियंदाना गोलंदाजीला आला. त्याने पहिल्या ३ चेंडूवर ३ फलंदाजाना पव्हेलियनचा रस्ता दाखवत हॅट्रिक घेतली. नंतर, ५व्या आणि ६व्या चेंडूवर आणखी २ फलंदाजाना तंबूत पाठवले. प्रियंदानाने या षटकामध्ये एक वाईड चेंडू टाकला त्यामुळे ५ विकेट्स घेताना त्याने फक्त एक धाव खर्च केली.या ५ विकेट्समुळे कंबोडियाचा डाव १६ व्या षटकातच संपला. इंडोनेशियाने हा सामना ६० धावांनी जिंकला.

इंडोनेशियन संघाने सामन्यात सातत्याने वर्चस्व गाजवले. एकेकाळी ५ बाद १०६ धावांवर असलेल्या कंबोडियन संघाला पुनरागमन करण्याची संधी होती. परंतु, प्रियंदानाच्या घातक गोलंदाजीसमोर कंबोडियन संघाला पराभव पत्करावा लागला.

टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एका षटकात ४ विकेट घेणारे खेळाडू

  • लसिथ मलिंगा (श्रीलंका) vs न्यूझीलंड, २०१९

  • रशीद खान (अफगाणिस्तान) vs आयर्लंड, २०१९

  • कर्टिस कॅम्पर (आयर्लंड) vs नेदरलँड्स, २०२१

  • जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) vs इंग्लंड, २०२२

प्रियंदानाच्याआधी या खेळाडूंनी रचला इतिहास

पुरुष क्रिकेटमध्ये एका षटकात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी यापूर्वी फक्त दोनदा देशांतर्गत टी-२० क्रिकेट स्पर्धांमध्ये झाली होती. २०१३-१४ च्या विजय दिन टी-२० कपमध्ये यूसीबी-बीसीबी इलेव्हनकडून खेळताना अल-अमीन हुसेन हा एकाच षटकात ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्यानंतर, निवृत्त भारतीय क्रिकेटपटू अभिमन्यू मिथुनने २०१९-२० च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत कर्नाटककडून खेळताना ही कामगिरी केली होती.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ