क्रीडा

CSK vs RCB : फिरकीचे चक्रव्यूह भेदण्याचे उद्दिष्ट! चेपॉकमध्ये आज बंगळुरूची चेन्नईशी गाठ; विराट-धोनी यांच्यातील जुगलबंदीकडेही लक्ष

चेपॉक येथील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर शुक्रवारी पुन्हा एकदा फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळेल. या चक्रव्यूहात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे फलंदाज फसणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

Swapnil S

चेन्नई : चेपॉक येथील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर शुक्रवारी पुन्हा एकदा फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळेल. या चक्रव्यूहात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे फलंदाज फसणार का, हे पाहणे रंजक ठरेल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी सायंकाळी रंगणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जची बंगळुरूशी गाठ पडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने चाहत्यांना विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोन तारांकित खेळाडूंमधील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

आयपीएलच्या १८व्या पर्वाला धडाक्यात प्रारंभ करताना रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरूने सलामीच्या लढतीत गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला धूळ चारली. पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या बंगळुरूसाठी फिरकीपटू कृणाल पंड्या, शिवम शर्मा यांनी चमक दाखवली. तसेच फलंदाजीत विराट व फिल सॉल्ट यांच्या सलामी जोडीने धडाकेबाज सुरुवात केली. आता चेपॉकच्या खेळपट्टीवर चेन्नईच्या फिरकी त्रिकुटाविरुद्ध बंगळुरूच्या फलंदाजांचा खरा कस लागेल. तसेच गतवर्षी अखेरच्या साखळी सामन्यात बंगळुरूने चेन्नईला नमवूनच बाद फेरी गाठली होती. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे बंगळुरूचे ध्येय असेल.

दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सवर ४ गडी राखून मात केली. नूर अहमद, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंनी फिरकीच्या जाळ्यात मुंबईच्या फलंदाजांची कोंडी केली. त्यानंतर ऋतुराजने आक्रमक, तर रचिन रवींद्रने झुंजार नाबाद अर्धशतक झळकावून संघाचा विजय साकारला. मात्र धोनीपर्यंत फलंदाजी लांबल्याने चेन्नईसाठी चिंतेचे कारणही आहे. गेल्या १७ वर्षांत चेन्नईने चेपॉकवर बंगळुरूकडून एकही पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे यावेळीही चेन्नईचेच पारडे जड मानले जात आहे.

दरम्यान, या लढतीवर पावसाचे सावट अजिबात नाही. तसेच येथे दव मोठ्या प्रमाणात येत असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे जाऊ शकते. मात्र नव्या नियमानुसार दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे चेंडू बदलण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज अपेक्षित आहे.

बेभरवशी फलंदाजीची बंगळुरूला चिंता

बंगळुरूच्या संघात विराटच्या रूपात सलामीला तारांकित फलंदाज असला तरी मधल्या फळीत त्यांच्याकडे भरवशाचा फलंदाज नाही. सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल यांच्याकडून बंगळुरूला फटकेबाजी अपेक्षित आहे. कर्णधार पाटीदार मात्र फिरकीपटूंवर हल्लाबोल करण्यात पटाईत आहे. गोलंदाजीचा विचार करता जोश हेझलवूडवर वेगवान माऱ्याची भिस्त असेल. भुवनेश्वर कुमार या लढतीसाठी संघात परतू शकतो. यश दयाल, रसिक डार यांचे पर्यायही बंगळुरूकडे आहेत. फिरकीमध्ये सुयश व कृणाल यांच्यावर बंगळुरूची मदार आहे. मोहित राठी किंवा स्वप्निल सिंग यांच्यापैकी एका फिरकीपटूला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बंगळुरूचा संघ संधी देऊ शकतो.

नूर, रचिनवर चेन्नईची भिस्त

मुंबईविरुद्ध ४ बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावणारा अफगाणी चायनामन फिरकीपटू नूर अहमद पुन्हा एकदा चेन्नईसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. त्याच्या सोबतीला अश्विन व जडेजाची अनुभवी जोडी आहेच. वेगवान गोलंदाज खलिल अहमदही उत्तम लयीत आहे. मथीशा पाथिराना मात्र या लढतीसाठीही अनुपलब्ध असेल, असे समजते. त्या स्थितीत सॅम करनवर दुहेरी जबाबदारी असेल. फलंदाजीत रचिन व ऋतुराज यांच्याकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. राहुल त्रिपाठी, दीपक हूडा, शिवम दुबे यांना खेळ उंचवावा लागेल. धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येणे अपेक्षित असले तरी चाहते त्याची फलंदाजी पाहण्यासाठी पुन्हा आतुर असतील. अश्विन व जडेजा फलंदाजीतही छाप पाडण्यास उत्सुक असतील.

उभय संघांत आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ३३ सामन्यांपैकी २१ वेळा चेन्नईने, तर ११ वेळा बंगळुरूने बाजी मारली आहे. एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आकडेवारीनुसार चेन्नईचे पारडे नक्कीच जड आहे. २००८मध्ये बंगळुरूने चेपॉक येथे चेन्नईला अखेरचे नमवले होते. त्यावेळीही विराट बंगळुरूचा भाग होता. आता १७ वर्षांनी पुन्हा एकदा बंगळुरूला चेपॉकमध्ये विजयाची संधी आहे.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, गुर्जापनीत सिंग, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल