अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पटलावर मंगळवारी नवा विजेता उदयास येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी घमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उभय संघांपैकी कोण बाजी मारून आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना पंजाबने यंदा अफलातून कामगिरी केली आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या क्वालिफायर-२ लढतीत त्यांनी पाच वेळच्या विजेत्या मुंबईला ५ गडी राखून सहज धूळ चारली. कर्णधार श्रेयसने लौकिकाला साजेशी खेळी साकारून पंजाबला तब्बल ११ वर्षांनी अंतिम फेरी गाठून दिली. २०१४मध्ये पंजाबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा श्रेयसच्या नेतृत्वात पंजाबचा संघ प्रथमच चषक उंचावण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने स्वप्नवत वाटचाल करताना ९ वर्षांनी पुन्हा, तर एकंदर चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २००९, २०११ व २०१६मध्ये बंगळुरूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा तारांकित फलंदाज विराट कोहलीसह तमाम बंगळुरूच्या चाहत्यांची स्वप्नपूर्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच बंगळुरूने क्वालिफायर-१ लढतीत पंजाबचा धुव्वा उडवून थाटात अंतिम फेरीत धडक मारली होती. आता पुन्हा एकदा पंजाबला नमवून १८व्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी उंचावण्याचे बंगळुरूचे स्वप्न असेल.
दरम्यान, उभय संघांत यंदाच्या हंगामातील तीन सामन्यांत (दोन साखळींत, एक बाद फेरीत) बंगळुरूने दोनदा, तर पंजाबने एकदा विजय मिळवला. मात्र पंजाबने अहमदाबाद येथे यंदाच्या हंगामात दोन्ही सामने (गुजरात, मुंबईविरुद्ध) जिंकले आहेत. तर बंगळुरूचा संघ या हंगामात मंगळवारी प्रथमच अहमदाबाद येथे खेळणार आहे. बंगळुरूने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात सातत्याने वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे ते ही परंपरा कायम राखणार की पंजाबसाठी अहमदाबाद पुन्हा लकी ठरणार, याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून आहे.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३६ सामन्यांपैकी पंजाबने १८, तर बंगळुरूनेही १८ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीवरून दोन्ही संघांत कडवी झुंज असल्याचे स्पष्ट होते. या हंगामात उभय संघांत झालेल्या तीनपैकी दोन लढतींमध्ये बंगळुरूने बाजी मारली, तर पंजाबने त्यांना एकदा नमवले.
खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज
-अहमदाबादमध्ये यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या ८ पैकी ६ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर फक्त दोन वेळा धावांच्या पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे.
-अहमदाबादमध्ये २०० ते २२० धावांचा पाठलाग करणेही सोपे जाऊ शकते. मात्र अंतिम फेरीसाठी कोणती खेळपट्टी वापरण्यात येणार, यावर सारे काही अवलंबून आहे. येथे दव मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे गोलंदाजांची समस्या वाढू शकते.
-अहमदाबादमध्ये मंगळवारी पावसाची तुरळक शक्यता आहे. मात्र पाऊस पडला तरी ९.३० वाजेपर्यंत पूर्ण २०-२० षटकांचा सामना खेळवण्याची मुभा आहे. त्याशिवाय लढतीसाठी अतिरिक्त दिवसही राखीव ठेवण्यात आला आहे.
सांघिक कामगिरी पंजाबची ताकद
पंजाबच्या संघात तब्बल ५ ते ६ खेळाडू अनकॅप्ड म्हणजेच एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले आहेत. तरीही या संघाने आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजीत श्रेयससह प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांवर व ऑस्ट्रेलियन जोश इंग्लिसवर पंजाबची मदार आहे. प्रियांश व प्रभसिमरन यांच्यापैकी एकाने ४५ हून अधिक धावा केल्यास पंजाबने सामना गमावलेला नाही. त्याशिवाय नेहल वधेरा, मार्कस स्टोइनिस व शशांक सिंग असे तडाखेबाजही त्यांच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत डावखुरा अर्शदीप सिंग व कायले जेमिसन पंजाबसाठी चमकदार कामगिरी करत आहेत. फिरकीपटू युझवेंद्र चहल त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. कोणतीही धावसंख्या यशस्वीपणे गाठण्याची पंजाबमध्ये क्षमता आहे.
विराट, हेझलवूडवर बंगळुरूची मदार
बंगळुरूसाठी साहजिकच या हंगामात पुन्हा एकदा विराट सर्वोत्तम कामगिरी करत आहे. त्याशिवाय गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने सातत्याने छाप पाडली आहे. विराट पहिल्या हंगामापासून बंगळुरूचा (आरसीबी) सदस्य आहे. त्यामुळे त्याने एकदा तरी आयपीएल जिंकावी, अशी असंख्य भारतीयांची इच्छा आहे. फिल सॉल्ट आक्रमक सुरुवात करत असून त्याला मधल्या फळीत पाटीदार, जितेश शर्मा यांच्याकडून सुरेख साथ लाभत आहे. टिम डेव्हिडच्या दुखापतीची बंगळुरूला चिंता आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार व यश दयाल या वेगवान जोडीकडून बंगळुरूला अपेक्षा आहे. पंजाबविरुद्ध क्वालिफायर-१मध्ये फिरकीच्या बळावर सामना फिरवणारा सूयश शर्मा पुन्हा लक्षवेधी ठरू शकतो.
पंजाब किंग्जचा आतापर्यंतचा प्रवास
गुणतालिकेत अग्रस्थान (१९ गुण, ०.३७२ धावगती)
साखळी फेरी
वि. गुजरात (११ धावांनी विजयी)
वि. लखनऊ (८ गडी राखून विजयी)
वि. राजस्थान (५० धावांनी पराभूत)
वि. चेन्नई (१८ धावांनी विजयी)
वि. हैदराबाद (८ विकेट्सने पराभूत)
वि. कोलकाता (१६ धावांनी विजयी)
वि. बंगळुरू (५ गडी राखून विजयी)
वि. बंगळुरू (७ विकेट्सने पराभूत)
वि. कोलकाता (सामना रद्द)
वि. चेन्नई (४ गडी राखून विजयी)
वि. लखनऊ (३७ धावांनी विजयी)
वि. राजस्थान (१० धावांनी विजयी)
वि. दिल्ली (६ विकेट्सने पराभूत)
वि. मुंबई (७ गडी राखून विजयी)
क्वालिफायर-१
वि. बंगळुरू (८ विकेट्सने पराभूत)
क्वालिफायर-२
वि. मुंबई (५ गडी राखून विजयी)
सर्वाधिक धावा
श्रेयस अय्यर
(१६ सामन्यांत ६०३ धावा)
सर्वाधिक बळी
अर्शदीप सिंग
(१६ सामन्यांत १८ बळी)
पंजाबने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २०१४मध्ये त्यांना कोलकाताकडून जेतेपदाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आतापर्यंतचा प्रवास
गुणतालिकेत दुसरे स्थान (१९ गुण, ०.३०१ धावगती)
साखळी फेरी
वि. कोलकाता (७ गडी
राखून विजयी)
वि. चेन्नई (५० धावांनी विजयी)
वि. गुजरात (८ विकेट्सने पराभूत)
वि. मुंबई (१२ धावांनी विजयी)
वि. दिल्ली (६ विकेट्सने पराभूत)
वि. राजस्थान (९ गडी राखून विजयी)
वि. पंजाब (५ विकेट्सने पराभूत)
वि. बंगळुरू (७ गडी राखून विजयी)
वि. राजस्थान (११ धावांनी विजयी)
वि. दिल्ली (६ गडी राखून विजयी)
वि. चेन्नई (२ धावांनी विजयी)
वि. कोलकाता (सामना रद्द)
वि. हैदराबाद (४२ धावांनी पराभूत)
वि. लखनऊ (६ गडी राखून विजयी)
क्वालिफायर-१
वि. पंजाब (८ गडी राखून विजयी)
सर्वाधिक धावा
विराट कोहली
(१४ सामन्यांत ६१४ धावा)
सर्वाधिक बळी
जोश हेझलवूड
(११ सामन्यांत २१ बळी)
प्रतिस्पर्धी संघ
-पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल, मिचेल ओव्हन, कायले जेमिसन.
-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड, मयांक अगरवाल, जोश हेझलवूड, ब्लेसिंग मुझरबानी, टिम सेईफर्ट.