IPL 2026 : कोटला आणि कोलकाताची दिल्लीला चिंता! घरच्या मैदानात पाचवा पराभव टाळण्याचे लक्ष्य; बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य (Photo-@asiacup)
क्रीडा

IPL 2026 : कोटला आणि कोलकाताची दिल्लीला चिंता! घरच्या मैदानात पाचवा पराभव टाळण्याचे लक्ष्य; बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्ससमोर घरचे मैदान म्हणजेच फिरोजशाह कोटला स्टेडियम आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचे कडवे आव्हान असेल.

Swapnil S

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्ससमोर घरचे मैदान म्हणजेच फिरोजशाह कोटला स्टेडियम आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचे कडवे आव्हान असेल. दिल्लीने घरच्या मैदानात सलग चार पराभव पत्करले असून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना आता विजय अनिवार्य असेल. त्यामुळेच सलग तीन लढती जिंकणाऱ्या कोलकाताविरुद्ध दिल्लीचा कस लागेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे. यंदाचा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दरम्यान, अक्षर पटेलच्या नेतृृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने १० पैकी फक्त ४ सामने जिंकले असून ८ गुणांसह ते सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. अरुण जेटली स्टेडियम (पूर्वीचे कोटला) येथे दिल्लीने यंदाच्या हंगामात पाचपैकी एकच लढत जिंकली आहे. गेल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध धावांचा पाठलाग करणे सोपे असल्याचे ठाऊक असूनही दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता शुक्रवारी पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल.

दिल्लीच्या संघाची फलंदाजी के. एल. राहुलवर अवलंबून आहे. पथुम निसांका, समीर रिझवी यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. तसेच करुण नायरच्या जागी पृथ्वी शॉ किंवा अभिषेक पोरेलला संधी देणे गरजेचे आहे. डेव्हिड मिलरसारखा फलंदाज दिल्लीचा संघ बाहेर ठेवत आहे. अक्षरनेही फलंदाज म्हणून सातत्याने निराशा केली आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्क व लुंगी एन्गिडी यांची वेगवान जोडी दिल्लीची ताकद आहे. मात्र फिरकीपटू कुलदीप यादव पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. विपराज निगम व आशुतोष शर्मा या खेळाडूंचाही दिल्लीला योग्य वापर करता आलेला नाही. त्यामुळे आता उर्वरित चार लढतींमध्ये दिल्लीचा संघ कशी कामगिरी करणार, याकडे लक्ष असेल.

दुसरीकडे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने ऐन वेळी लय मिळवली आहे. सुरुवातीच्या सहापैकी पाच लढती गमावल्यानंतर कोलकाताने सलग तीन सामने जिंकले आहेत. गेल्या लढतीत त्यांनी हैदराबादला धूळ चारली. आता मथिशा पाथिरानाही संघात दाखल झाल्याने कोलकाताची ताकद वाढली आहे. कॅमेरून ग्रीन, सुनिल नरिन व टिम सेईफर्ट या विदेशी खेळाडूंकडून कोलकाताला सातत्य अपेक्षित आहे. ‌फिरकीपटू वरुण चक्रवर्ती त्यांच्यासाठी किफायतशीर ठरत आहे. कोलकाताचे ९ सामन्यांत ७ गुण असून त्यांनी उर्वरित पाचही लढती जिंकल्या, तर तेसुद्धा बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतील. त्यामुळे शुक्रवारची लढत निर्णायक ठरणार आहे.

उभय संघांत आतापर्यंत ३५ सामने झाले आहेत. त्यांपैकी कोलकाताने १९, तर दिल्लीने १५ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे आकडेवारी कोलकाताच्या बाजूने असून त्यांना रोखणे दिल्लीसाठी सोपे नसेल.

खेळपट्टीचा अंदाज

दिल्लीत यंदा झालेल्या पाचपैकी चार सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. येथे दवही मोठ्या प्रमाणात येत असल्याने २२० ते २४० धावाही पार केल्या जाऊ शकतात. कोलकाताविरुद्धच्या लढतीसाठी गवत नसलेली ‘हाय स्कोरिंग’ खेळपट्टी वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

Mumbai : आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी; पालिका मुख्यालयातील भाजप कार्यालयात मशीन कार्यान्वित

शहरांचे होणार विशेष ऑडिट; शहरांमधील जीवनमान, सुविधांची उपलब्धता निकषांवर होणार लेखापरीक्षण

बंगळुरू ते मुंबई प्रवास होणार सुसाट! जूनअखेरीस सुपरफास्ट ट्रेन धावणार; वंदे भारत स्लीपरचीही शक्यता

मद्य दरवाढीसाठी उत्पादकांचे राज्य सरकारांना साकडे; पश्चिम आशियातील संकटामुळे उत्पादन खर्चात वाढ, बाटल्या, कॅनच्या किमती वधारल्या

Thane : १४ दरडप्रवण भागांतील रहिवाशांना नोटीस; मान्सूनपूर्व महापालिकेची हालचाल, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन