IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सला विजय आवश्यक; राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज भिडणार 
क्रीडा

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सला विजय आवश्यक; राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज भिडणार

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या महत्त्वपूर्ण सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीचा सामना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या स्विंग आणि सीम गोलंदाजीशी होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या महत्त्वपूर्ण सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीचा सामना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या स्विंग आणि सीम गोलंदाजीशी होणार आहे. दोन्ही संघांसाठी प्ले-ऑफची आशा जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. १२ सामन्यांत १० गुण मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील फेरीत पोहोचण्याच्या शक्यता आधीच धूसर असून या सामन्यात पराभव झाल्यास त्यांना प्ले-ऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडावे लागेल.

दुसरीकडे ११ सामन्यांत १२ गुण मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला आठवड्याभराच्या विश्रांतीमुळे नवीन ऊर्जा मिळाली असेल. पंजाब किंग्जचा संघ १२ सामन्यांत १३ गुणांसह चौथ्या स्थानी असल्याने राजस्थानचा संघ या सामन्यात दिल्लीला कोणतीही संधी देण्यास तयार नाही. बिहारमधील समस्तीपूरचा शाळकरी मुलगा असलेल्या वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकरनंतर क्रीडाप्रेमींच्या मनावर राज्य केले असून त्याची दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर होणारी खेळी पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

आरसीबी किंवा चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात कोटला मैदानावर अनुक्रमे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या नावाचाच दबदबा पाहायला मिळतो. त्यामुळे येथील क्रीडाप्रेमी सूर्यवंशीची फलंदाजी प्रत्यक्ष पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

११ सामन्यांत २३६.५५ च्या स्ट्राईक रेटने ४४० धावा करणाऱ्या सूर्यवंशीला मिचेल स्टार्क कसा रोखतो, हे पाहणे रंजक ठरेल. खेळपट्टीकडून सुरुवातीला स्टार्कला मदत मिळाल्यास सूर्यवंशीच्या तंत्राची खरी परीक्षा असेल.

दिल्लीच्या फिरकी आक्रमणात कर्णधार अक्षर पटेलने १२ सामन्यांत १० बळी आणि कुलदीप यादवने ११ सामन्यांत ७ बळी घेतले असून या जोडीला धावा रोखण्यात किंवा गडी बाद करण्यात अपयश आले आहे. लुंगी एन्गिडीचा अपवाद वगळता दिल्लीचे टी. नटराजन (११.१८ इकॉनॉमी रेट) आणि मुकेश कुमार (१०.६७इकॉनॉमी रेट) यांसारखे भारतीय वेगवान गोलंदाज सुमार ठरले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद .

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, अॅडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून

समान नागरी कायद्याची प्रक्रिया लवकरच; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती, नाशिकची ट्रिपल तलाक लक्षवेधी गाजली

होर्मुझमधून ११ जहाजांचा सुरक्षित प्रवास

कार्यकाळ संपल्याने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा

Mumbai : पैशांपायी दमछाक, तरीही BEST घेणार १५०० मिडी बसेस; सात हजार कोटी खर्चाचा प्रस्ताव, बेस्ट समितीची मंजुरी

पाच वर्षांत ४४ हजार मेगावाॅट वीज खरेदीचे करार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस