लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या लढतीत तळाच्या लखनऊ सुपर जायंट्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कडवे आव्हान असेल. एकीकडे सलग सहा पराभव पत्करणारा लखनऊ विजयपथावर परतण्यास आतुर असेल, तर बंगळुरूचा संघ अव्वल दोन क्रमांक राखण्यास उत्सुक असेल. अटल बिहारी वाजपेयी म्हणजेच एकाना स्टेडियमवरील या लढतीत फलंदाजांचा मात्र कस लागेल, हे निश्चित.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे. यंदाचा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
दरम्यान, रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने ९ पैकी ६ लढती जिंकल्या असून त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित पाचपैकी किमान २ लढती जिंकणे गरजेचे आहे. गेल्या सामन्यात बंगळुरूला गुजरातकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता हा संघ विजयपथावर परतण्यासाठी सर्वस्व अर्पण करेल. मात्र लखनऊच्या खेळपट्टीवर बंगळुरूच्या फलंदाजांचा कस लागू शकतो. येथे दोन वेळा १६० धावांचा पाठलाग करणेही जमलेले नाही. कोलकाता-लखनऊ लढत सुपर-ओव्हरपर्यंत रंगली होती, तर राजस्थानने लखनऊला १५५ धावांचा पाठलाग करू दिला नव्हता. म्हणजेच गोलंदाज येथे भारी पडत असल्याचे दिसून येते.
फिल सॉल्ट दुखापतीमुळे मायदेशी परतला असल्याने जेकब बेथल विराट कोहलीसह सलामीला येत आहे. मात्र बेथल अद्याप छाप पाडू शकलेला नाही. तसेच मधल्या फळीत पाटीदार व देवदत्त पडिक्कल यांना सातत्य दाखवणे गरजेचे आहे. जितेश शर्मा व रोमारिओ शेफर्ड सातत्याने संघर्ष करत आहेत. गोलंदाजी मात्र बंगळुरूची ताकद आहे. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांची वेगवान जोडी, तर कृणाल पंड्या व सूयश शर्मा यांची फिरकी जोडी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहे.
दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणारा लखनऊचा संघ ९ सामन्यांतील फक्त २ विजयांसह गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांनी सलग सहा सामने गमावले आहेत. त्यामुळे आता लखनऊला उर्वरित पाचही लढती जिंकून आव्हान कायम राखण्यासाठी धडपड करावी लागेल. गेल्या लढतीत मुंबईविरुद्ध लखनऊने २२८ धावा केल्या होत्या. त्यामुळे निकोलस पूरन, मिचेल मार्श, जोश इंग्लिस या विदेशी फलंदाजांपासून बंगळुरूला सावध रहावे लागेल. पंतचा फॉर्म खराब आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, प्रिन्स यादव यांच्यावर लखनऊची भिस्त आहे. मात्र आवेश खान, सिद्धार्थ व दिग्वेश राठी यांनी निराशा केली आहे. एकूणच लखनऊला विजय मिळवण्यासाठी सांघिक कामगिरी उंचवावी लागेल.
खेळपट्टीचा अंदाज
कोलकाताविरुद्ध ज्या खेळपट्टीवर लढत झाली होती, तेथेच गुरुवारचा सामना होणार आहे. त्यामुळे गोलंदाजांचे येथे वर्चस्व पाहायला मिळू शकते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १७०हून अधिक धावा केल्या, तर धावांचा पाठलाग करणे कठीण जाऊ शकते.
भुवनेश्वर-शमीवर लक्ष
- भुवनेश्वरने यंदा ९ सामन्यांत १७ बळी घेतले असून तो पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. दुसरीकडे शमीने ८ सामन्यांत ९ बळी घेतले आहेत. या दोन्ही गोलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.
लखनऊ पलटवार करणार का?
- उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी बंगळुरूने ५, तर लखनऊने २ लढती जिंकल्या आहेत. यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील लढतीतही बंगळुरूनेच बाजी मारली होती. त्यामुळे लखनऊ यावेळी पलटवार करणार का, याकडे लक्ष असेल.