IPL 2026 : क्वालिफायर-१ चा मान कुणाला? अग्रस्थानावरील बंगळुरूसमोर आज धडाकेबाज हैदराबादचे कडवे आव्हान 
क्रीडा

IPL 2026 : क्वालिफायर-१ चा मान कुणाला? अग्रस्थानावरील बंगळुरूसमोर आज धडाकेबाज हैदराबादचे कडवे आव्हान

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत अग्रस्थानावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही बाद फेरीसाठी पात्र ठरलेले संघ आमनेसामने येतील.

Swapnil S

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत अग्रस्थानावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही बाद फेरीसाठी पात्र ठरलेले संघ आमनेसामने येतील. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत विजय मिळवणारा संघ क्वालिफायर-१ सामन्यातील स्थान पक्के करेल. त्यामुळेच दोन्ही संघांतील जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. बंगळुरू, गुजरात व हैदराबाद या संघांनी बाद फेरी गाठलेली असून उर्वरित एका स्थानासाठी पाच संघांत चुरस आहे. आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्लालिफायर-२’मध्ये खेळतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ लढत होते. यांच्यातील विजेता ‘क्वालिफायर-२’ साठी पात्र ठरतो. तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जातो. म्हणजे एकूणच अव्वल दोन संघांत स्थान मिळवणाऱ्या संघांला अंतिम फेरी गाठण्यासह ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी असते. तर त्याउलट एलिमिनेटर खेळणाऱ्या संघांना चषक पटकावण्यासाठी सलग तीन सामने जिंकावे लागतात.

दरम्यान, यंदा २४ मे रोजी साखळी फेरी संपेल. बुधवारी रात्रीच्या गुणतालिकेनुसार (गुजरात-चेन्नई सामन्यापूर्वी) बंगळुरू १८ गुणांसह अग्रस्थानी आहे, तर गुजरात व हैदराबाद १६ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. धावगतीच्या (नेटरनरेट) तुलनेत बंगळुरू सर्वांपुढे आहे. त्यामुळेच हैदराबादने बंगळुरूला मोठ्या फरकाने नमवले, तर ते १८ गुणांसह अव्वल दोन संघांत स्थान मिळवू शकतात.

गतविजेत्या बंगळुरूने यंदाही अपेक्षेप्रमाणे दमदार खेळ केला आहे. कर्णधार रजत पाटीदार, तारांकित विराट कोहली, देवदत्त पडिक्कल हे आगाडीचे त्रिकुट त्यांची ताकद आहे. मधल्या फळीत टिम डेव्हिड, कृणाल पंड्या गरजेनुसार फटकेबाजी करू शकतात. भुवनेश्वर कुमार बंगळुरूच्या गोलंदाजीचा कणा असून त्याला जोश हेझलवूडची सुरेख साथ लाभत आहे. फक्त रोमारिओ शेफर्ड आणि सूयश शर्माच्या कामगिरीची या संघाला चिंता सतावत आहे. जेकब डफीसुद्धा संघर्ष करताना दिसत आहे. हंगामाच्या पहिल्या लढतीत बंगळुरूने हैदराबादलाच चिन्नास्वामी येथे नमवले होते. आता पुन्हा एकदा तशी कामगिरी करून ते थाटात क्वालिफायर-१ गाठण्यास आतुर असतील.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने सुरुवातीच्या चार सामन्यांनंतर फिनिक्स भरारी घेतली आहे. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि इशान किशन या डावखुऱ्या त्रिकुटावर हैदराबादची फलंदाजी अवलंबून आहे. तसेच हेनरिच क्लासेन या संघाचा हुकमी एक्का आहे. गोलंदाजीत कमिन्स, इशान मलिंगा, प्रफुल्ल हिंगे व साकिब हुसैन यांची वेगवान चौकडी कमाल करत आहे. मात्र खेळपट्टी काहीशी संथ असल्यास हैदराबादचा संघ अडचणीत आल्याचे या हंगामात दिसून आले आहे. त्यामुळे लढत रंगतदार होऊ शकते.

उभय संघांत आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. त्यांपैकी हैदराबादने १४, तर बंगळुरूने १२ लढती जिंकल्या आहेत. उभय संघातच यंदाच्या हंगामात सलामीचा सामना झाला होता. त्यावेळी बंगळुरूने बाजी मारली होती. आता हैदराबादकडे वचप्याची संधी आहे.

खेळपट्टीचा अंदाज

हैदराबादच्या खेळपट्टी क्रमांक दोनवर ही लढत होणार आहे. येथेच हैदराबादने दोन वेळा प्रथम फलंदाजी करताना अनुक्रमे २४२ व २३४ अशी धावसंख्या उभारून विजय मिळवला होता. लढतीवर पावसाचे सावट नसून येथे गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल, असे दिसते.

प्रतिस्पर्धी संघ

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे, आर. अंब्रिश.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, रिचर्ड ग्लीसन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

माल पोहोचल्याची आता डिजिटल नोंद; ई-वे बिल पोर्टलवर सुविधा सुरू

पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ

...तर पॅरोल नाकारणे घटनाबाह्य! मुंबई उच्च न्यायालयाचा कैद्यांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

Pune : नसरापूर अत्याचारप्रकरणी २८ मे रोजी दोषारोप ठेवणार