IPL 2026 : राजस्थानचा बाद फेरीत प्रवेश; मुंबईवर ३० धावांनी दमदार विजय; पंजाब, कोलकाताचेही आव्हान संपुष्टात  (Photo - FPJ)
क्रीडा

IPL 2026 : राजस्थानचा बाद फेरीत प्रवेश; मुंबईवर ३० धावांनी दमदार विजय; पंजाब, कोलकाताचेही आव्हान संपुष्टात

संपूर्ण हंगामात निराशा केलेल्या मुंबई इंडियन्सला अखेरच्या लढतीतही पराभव पत्करावा लागला.

Swapnil S

मुंबई : संपूर्ण हंगामात निराशा केलेल्या मुंबई इंडियन्सला अखेरच्या लढतीतही पराभव पत्करावा लागला. राजस्थान रॉयल्सने रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईला ३० धावांनी धूळ चारली. त्यामुळे राजस्थानने थाटात बाद फेरीत प्रवेश केला, तर मुंबईच्या पराभवामुळे पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचे आव्हानही संपुष्टात आले.

जवळपास २५ हजारांहून अधिक शालेय मुलांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत जोफ्रा आर्चर राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने १५ चेंडूंत ३२ धावा करतानाचा गोलंदाजीत १७ धावा देत ३ बळी मिळवले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद २०५ धावा केल्या. मात्र मुंबईला २० षटकांत ९ बाद १७५ धावांवरच समाधान मानावे लागले. सूर्यकुमार यादवने ४२ चेंडूंत ६०, तर कर्णधार हार्दिक पंड्याने १५ चेंडूंत ३४ धावा केल्या. मात्र अन्य फलंदाज अपयशी ठरले. तसेच सूर्यकुमार आणि हार्दिक चुकीच्या क्षणी बाद झाले. रोहित शर्मा (०), तिलक वर्मा (३) लवकर बाद झाले. परिणामी मुंबईचा हंगामात दहावा पराभव झाला. त्यांना नवव्या स्थानी समाधान मानावे लागले.

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. बंगळुरू, गुजरात व हैदराबाद या संघांनी बाद फेरी गाठलेली असून उर्वरित एका स्थानासाठी चार संघांत चुरस आहे. आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्लालिफायर-२’मध्ये खेळतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ लढत होते. यांच्यातील विजेता ‘क्वालिफायर-२’ साठी पात्र ठरतो. तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जातो. म्हणजे एकूणच अव्वल दोन संघांत स्थान मिळवणाऱ्या संघांला अंतिम फेरी गाठण्यासह ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी असते, तर त्याउलट एलिमिनेटर खेळणाऱ्या संघांना चषक पटकावण्यासाठी सलग तीन सामने जिंकावे लागतात.

दरम्यान, २६ मे रोजी धरमशाला येथे क्वालिफायर-१ सामना होईल. २७ मे रोजी मुल्लानपूर येथे एलिमिनेटर लढत होईल. २९ मे रोजी मुल्लानपूरलाच क्वालिफायर-२ सामना होईल. मग रविवार, ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाअंतिम मुकाबला रंगेल. बंगळुरू आणि गुजरात यांच्यात क्वालिफायर-एक सामना होईल, तर एलिमिनेटरमध्ये हैदराबादसमोर राजस्थानचे आव्हान असेल.

मुंबई-राजस्थान लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पंजाबने शनिवारी लखनऊला नमवल्यामुळे त्यांचे चाहते मुंबईला पाठिंबा देत होते. त्यातच मुंबईने उत्तम बुलंदजी करताना पावरप्ले मध्येच वैभव सूर्यवंशी (४) आणि यशस्वी जयस्वाल (२७) यांना माघारी पाठवले. मात्र ध्रुव जुरेल (३८) आणि शनका (२९) यांनी राजस्थानला सावरले. मग अखेरीस जडेजा (नाबाद १९) आणि आर्चर यांनी राजस्थानला २०० धावांपलीकडे नेले. अखेरीस गोलंदाजांनी राजस्थानला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

मुंबईने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एका हंगामात वानखेडेवर ५ सामने गमावले. यापूर्वी २०२४ मध्ये मुंबईने वानखेडेवर चार सामन्यांत पराभव पत्करला होता. यंदा आयपीएलच्या बाद २ फेरीत दाखल झालेल्या चारही संघांना दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद