IPL 2026 : तिघांचे ठरले, चौथ्यासाठी चुरस! बंगळुरू, गुजरात, हैदराबाद यांचे आयपीएलच्या बाद फेरीतील स्थान पक्के 
क्रीडा

IPL 2026 : तिघांचे ठरले, चौथ्यासाठी चुरस! बंगळुरू, गुजरात, हैदराबाद यांचे आयपीएलच्या बाद फेरीतील स्थान पक्के

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर आहे.

Swapnil S

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. सोमवारी सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केल्याने बाद फेरीतील आणखी दोन संघ निश्चित झाले. म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह गुजरात टायटन्स व हैदराबाद यांनी बाद फेरी गाठलेली आहे. त्यामुळे तीन संघ ठरले असून आता फक्त चौथ्या स्थानासाठी पाच संघांत चुरस पाहायला मिळणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्लालिफायर-२’मध्ये खेळतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ लढत होते. यांच्यातील विजेता ‘क्वालिफायर-२’ साठी पात्र ठरतो. तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जातो. म्हणजे एकूणच अव्वल दोन संघांत स्थान मिळवणाऱ्या संघांला अंतिम फेरी गाठण्यासह ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी असते. तर त्याउलट एलिमिनेटर खेळणाऱ्या संघांना चषक पटकावण्यासाठी सलग तीन सामने जिंकावे लागतात.

२४ मे रोजी साखळी फेरी संपेल. त्यानंतर २६ मे रोजी धरमशाला येथे क्वालिफायर-१ सामना होईल. २७ मे रोजी मुल्लानपूर येथे एलिमिनेटर लढत होईल. २९ मे रोजी मुल्लानपूरलाच क्वालिफायर-२ सामना होईल. मग रविवार, ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाअंतिम मुकाबला रंगेल. तूर्तास बंगळुरू अग्रस्थानी आहे, तर गुजरात व हैदराबाद अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नेटरनरेट म्हणजेच धावगतीच्या तुलनेत बंगळुरू सर्वांपुढे आहे. मात्र शेवटच्या साखळी सामन्यानंतरच कोणता संघ कोणत्या क्रमांकावर कायम राहील, हे स्पष्ट होईल.

मुंबई, लखनऊ यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता पंजाब, चेन्नई, कोलकाता, राजस्थान व दिल्ली या पाच संघांत एका जागेसाठी पुढील ४-५ दिवस जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. एकूणच आयपीएलची क्रेझ वाढली असून चाहत्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून निखळ मनोरंजन होत आहे.

तसेच आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकदाच म्हणजे २०१६मध्ये तिसऱ्या क्रमांकावरून बाद फेरी गाठत हैदराबादने एलिमिनेटर लढतीसह क्वालिफायर-२ व अंतिम फेरीही जिंकली आहे. अन्यथा दर वेळी पहिल्या दोन स्थानांवरील संघच विजेतेपद मिळवतो. म्हणूनच सर्व संघ अव्वल दोन स्थानांत मजल मारण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. यावेळी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असेल.

'या' पाच संघांत शर्यत

बाद फेरीतील चौथे स्थान गाठण्यासाठी (सोमवारच्या गुणतालिकेनुसार) पंजाब (१३), राजस्थान (१२), चेन्नई (१२), दिल्ली (१२) व कोलकाता (११) या पाच संघांत चुरस आहे. पंजाबने सलग सहा पराभव पत्करले असून त्यांचा शेवटचा सामना लखनऊशी होईल. कोलकाताला मुंबई आणि दिल्लीविरुद्ध खेळायचे आहे. चेन्नईचा शेवटचा सामना गुजरातविरुद्ध होईल. दिल्लीची अखेरची लढत कोलकाताविरुद्ध होणार आहे. राजस्थानचे लखनऊ, मुंबईविरुद्ध सामने शिल्लक आहेत.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

किंमत तीच, वजन कमी! कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे कंपन्यांपुढे पर्याय

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO