मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १९व्या हंगामाचे उर्वरित वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. ३१ मार्चपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही एकूण ७० साखळी सामने होतील. बाद फेरीच्या तारखा व ठिकाण नंतरला स्पष्ट होतील. यंदा चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर गुरुवार, २३ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीचा थरार अनुभवायला मिळेल. धोनीचा हा वानखेडेवर अखेरचा सामना ठरू शकतो.
काही आठवड्यांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.
आता आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध सर्वांना लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. काही दिवसांपूर्वी १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे त्यावेळी बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता तिन्ही राज्यांतील निवडणुकांची तारखी समोर आलेली आहे. त्यामुळे स्पर्धा चालू होण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.
दरम्यान, यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. आयपीएलमध्ये मुंबई-चेन्नई लढतीची नेहमीच उत्कंठा लागून असते. यंदा चाहत्यांना दोन वेळा या संघांमधील द्वंद्व पाहायला मिळेल. २३ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई-चेन्नई आमनेसामने येतील. महेंद्रसिंह धोनीचा हा वानखेडेवर अखेरचा आयपीएल सामना ठरू शकतो. त्यानंतर २ मे रोजी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर मुंबई पुन्हा चेन्नईशी दोन हात करेल.
गतवर्षी मुंबईचा संघ गुजरात व दिल्लीविरुद्ध वानखेडेवर सामना खेळला होता. यंदा त्या दोघांविरुद्ध मुंबईचा वानखेडेवर सामना नसेल. त्यांच्या ऐवजी राजस्थान व पंजाब यंदा मुंबईविरुद्ध वानखेडेवर खेळतील. पंजाबविरुद्ध २०२३मध्ये, तर राजस्थानविरुद्ध २०२४मध्ये मुंबईचा वानखेडेवर अखेरचा सामना झाला होता. यंदा एकंदर मुंबईचा संघ अनुक्रमे कोलकाता, बंगळुरू, पंजाब, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ व राजस्थान या संघांविरुद्ध सात सामने वानखेडेवर खेळणार आहे. २९ मार्च रोजी कोलकाताविरुद्धच्या लढतीने मुंबईचा संघ आपल्या अभियानास प्रारंभ करणार आहे.
वेळापत्रकातील महत्त्वाची बाब म्हणजे यंदा विराट कोहलीचा समावेश असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व चेन्नई यांच्यात एकदाच लढत होईल. ५ एप्रिल रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होईल. आता वेळापत्रक जाहीर झाल्याने सर्व चाहत्यांनी आवडत्या सामन्यांनुसार तिकिटांसाठी धडपड चालू केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने
मुंबई वि. कोलकाता (रविवार, २९ मार्च : सायंकाळी ७.३० वाजता)
मुंबई वि. बंगळुरू (रविवार, १२ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)
मुंबई वि. पंजाब (गुरुवार, १६ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)
मुंबई वि. चेन्नई (गुरुवार, २३ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)
मुंबई वि. हैदराबाद (बुधवार, २९ एप्रिल : सायंकाळी ७.३० वाजता)
मुंबई वि. लखनऊ (सोमवार, ४ मे : सायंकाळी ७.३० वाजता)
मुंबई वि. राजस्थान (रविवार, २४ मे : दुपारी ३.३० वाजता)
मुंबई इंडियन्सचे १४ साखळी सामने
२९ मार्च वि. कोलकाता
४ एप्रिल वि. दिल्ली
७ एप्रिल वि. राजस्थान
१२ एप्रिल वि. बंगळुरू
१६ एप्रिल वि. पंजाब
२० एप्रिल वि. गुजरात
२३ एप्रिल वि. चेन्नई
२९ एप्रिल वि. हैदराबाद
२ मे वि. चेन्नई
४ मे वि. लखनऊ
१० मे वि. बंगळुरू
१४ मे वि. पंजाब
२० मे वि. कोलकाता
२४ मे वि. राजस्थान