IPL 2026 : एकाचा धडाका, दुसऱ्याची निराशा; मुल्लानपूर येथे आज होणाऱ्या एलिमिनेटर लढतीत हैदराबाद-राजस्थान यांच्यात घमासान 
क्रीडा

IPL 2026 : एकाचा धडाका, दुसऱ्याची निराशा; मुल्लानपूर येथे आज होणाऱ्या एलिमिनेटर लढतीत हैदराबाद-राजस्थान यांच्यात घमासान

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आत बाद फेरीच्या टप्प्यात आहे. आता बुधवारी होणाऱ्या एलिमिनेटर लढतीत एखादा संघ धूमधडाका करेल, तर अन्य संघाच्या पदरी निराशा पडल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.

Swapnil S

मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आत बाद फेरीच्या टप्प्यात आहे. आता बुधवारी होणाऱ्या एलिमिनेटर लढतीत एखादा संघ धूमधडाका करेल, तर अन्य संघाच्या पदरी निराशा पडल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. मुल्लानपूर येथे सनरायजर्स हैदराबादसमोर राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असणार आहे. दोन्ही संघांतील जुगलबंदीकडे वैभव सूर्यवंशी विरुद्ध अभिषेक शर्मा यांच्यातील फलंदाजीच्या निमित्तानेही पाहिले जात आहे.

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता निर्णायक वळणावर आहे. बंगळुरू, गुजरात, हैदराबाद व राजस्थान या संघांनी बाद फेरी गाठलेली असून अन्य सहा संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्लालिफायर-२’मध्ये खेळतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ लढत होते. यांच्यातील विजेता ‘क्वालिफायर-२’ साठी पात्र ठरतो, तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जातो.

बंगळुरू आणि गुजरात यांच्यात क्वालिफायर-१ सामना झाला, तर २७ मे रोजी मुल्लानपूर येथे होणाऱ्या एलिमिनेटरमध्ये हैदराबादसमोर राजस्थानचे आव्हान असेल. २९ मे रोजी मुल्लानपूरलाच क्वालिफायर-२ सामना होईल. ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाअंतिम मुकाबला रंगेल. यंदा एलिमिनेटर व क्वालिफायर-२ लढत एकाच स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे क्वालिफायर-१ गमावणाऱ्या संघाला अतिरिक्त प्रवास करावा लागेल. क्वालिफायर-२नंतर दोन दिवसांतच अंतिम सामना असल्याने खेळाडूंचा कस लागेल.

दरम्यान, पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने साखळी फेरीत १४ पैकी ९ लढती जिंकून १८ गुण कमावले. मात्र नेटरनरेटमुळे त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. आता मुल्लानपूर येथे राजस्थानला नमवण्याचे आव्हान हैदराबादपुढे असेल. हैदराबादला येथे यंदाच्या हंगामात पंजाबविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता, तर राजस्थानने मात्र पंजाबला येथेच धूळ चारली होती. धावांचा पाठलाग करणे मुल्लानपूर येथे सोपे जात असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो.

ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा व इशान किशन या आघाडीच्या त्रिकुटावर हैदराबादची भिस्त आहे. मात्र हैदराबादसाठी या हंगामात खरा मॅचविनर हेनरिच क्लासेन ठरला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत क्लासेन मधल्या फळीत खेळूनही अव्वल पाच फलंदाजांत टिकून आहे. तसेच नितीश रेड्डी, स्मरण व सलील यांनीही गरजेनुसार फटकेबाजी केली आहे.

कमिन्सच्या समावेशामुळे हैदराबादची गोलंदाजी परिपूर्ण झाली आहे. साकिब व प्रफुल्ल यांचा युवा जोश, इशान मलिंगाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. फिरकी विभागात हा संघ काहीसा फिका आहे. मात्र हर्ष दुबे व शिवांग कमाल करू शकतात. वैभवविरुद्ध कमिन्सची गोलंदाजी निर्णायक ठरेल.

दुसरीकडे रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने रविवारी मुंबईला वानखेडेवर धूळ चारून बाद फेरीतील स्थान पक्के केले. त्यांनी १४ सामन्यांत ८ विजय मिळवून चौथ्या क्रमांकासह आगेकूच केली. वैभव आणि यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांवर राजस्थानची फलंदाजी अवलंबून आहे. ध्रुव जुरेल व पराग यांनीही अधूनमधून छाप पाडली आहे. रवींद्र जडेजा व दसुन शनका यांच्याकडे फटकेबाजीची क्षमता असून डोनोवन फरेरा फॉर्मात आहे.

गोलंदाजीत जोफ्रा आर्चर राजस्थानचा तारणहार आहे. त्याला नांद्रे बर्गर व ब्रिजेश शर्मा उत्तम साथ देत आहेत. फिरकी विभागात जडेजा व यश पुंजाचा पर्याय उपलब्ध आहे. एकूणच राजस्थानकडेही उत्तम गोलंदाजीचा संच असल्याने ते हैदराबादला नक्कीच कडवी झुंज देतील. फक्त त्यांना आघाडीच्या फलंदाजांकडून उत्तम सुरुवात अपेक्षित आहे.

यंदाच्या हंगामात राजस्थान व हैदराबाद दोन वेळा आमनेसामने आले होते. त्यामध्ये दोन्ही वेळेस हैदराबादने बाजी मारली. एका लढतीत प्रफुल्लने पहिल्याच षटकात वैभवचा अडसर दूर केला. तेथूनच हैदराबादचे विजयपथावर पुनरागमन झाले. तर एकदा हैदराबादने २२८ धावांचा सहज पाठलाग केला. बेधडक फलंदाजी हैदराबादची आधीपासूनच ताकद आहे. त्यामुळे राजस्थानच्या गोलंदाजांना यावेळी हैदराबादच्या फलंदाजांविरुद्ध अधिक ताकदीनिशी उतरावे लागेल. अन्यथा त्यांच्या पदरी निराशा पडू शकते. राजस्थानला २००८ नंतर दुसरे जेतेपद खुणावत आहे.

खेळपट्टीचा अंदाज

मुल्लानपूर येथे यंदाच्या हंगामात झालेले ३ सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. खेळपट्टी क्रमांक चारवर बुधवारी लढत होणार असून येथे २३० ते २४० धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गरजेचे आहे. पावसाचे या लढतीवर मूळीच सावट नाही.

उभय संघांत आतापर्यंत २३ सामने झाले आहेत. त्यांपैकी हैदराबादने १४, तर राजस्थानने ९ लढती जिंकल्या आहेत. तसेच उभय संघांत यंदाच्या हंगामात झालेल्या दोन्ही लढतींमध्ये हैदराबादनेच बाजी मारली आहे. आता राजस्थान पलटवार का, याकडे लक्ष असेल.

प्रतिस्पर्धी संघ

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे, अंब्रिश.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

देशभरातील ATM चे व्यवहार महाग होणार; रोकड भरणाऱ्या कंपन्यांकडून मानधन वाढविण्याची मागणी, देखभाल खर्चात २० टक्क्यांची वाढ

जिल्हा बँकांना ‘सायबर सिक्युरिटी’ बंधनकारक; सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांचे आदेश

Pune : माऊलींच्या मंदिराची सुरक्षा AI कडे; मंदिर संस्थान कमिटीची घोषणा

नाशिक टीसीएस प्रकरण : मतीन पटेलसह घरमालकाची चौकशी; SIT कडून मोबाईल जप्त, गरज पडल्यास पुन्हा चौकशी

पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी दागिन्यांची बॅग केली परत