अबूधाबी : ऑस्ट्रेलियाचा प्रतिभावान अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. अबूधाबी येथे मंगळवारी आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी खेळाडूंच्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने ग्रीनला २५.२० कोटी रुपयांत खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील तो आजवरचा सर्वाधिक महागचा विदेशी खेळाडू आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जने भारताच्या अनकॅप्ड खेळाडूंवर (आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले) मोठी बोली लावली.
दरवर्षीप्रमाणे २०२६मध्येही मार्च ते मे महिन्यात आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यासाठी यावेळी मिनी ऑक्शनचे आयोजन करण्यात आले होते. २०२५च्या आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन झाले होते. कारण त्यावेळी संघांना आपल्याकडे ४-५ खेळाडू राखण्याचीच मुभा होती. मात्र यावेळी बहुतांश संघांनी लिलावापूर्वीच १५ ते २० खेळाडू संघात कायम राखले आहेत. आता थेट २०२८च्या आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होईल. तोपर्यंत लहानश्या स्वरूपाचे एकदिवसीय मिनी ऑक्शनच घेण्यात येईल. श्रीलंकेचा मथीशा पाथिराना (१८ कोटी) यंदाच्या लिलावातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. त्यालासुद्धा कोलकाताने घेतले, तर डावखुरा अष्टपैलू प्रशांत वीर आणि यष्टिरक्षक फलंदाज कार्तिक शर्मा यांना चेन्नईने प्रत्येकी १४.२० कोटी रुपयांत संघात सहभागी केले.
दरम्यान, कोलकाताचा आंद्रे रसेल व दिल्लीचा फॅफ डूप्लेसिस यांनी या लीगमधून निवृत्ती जाहीर केली होती. रसेल कोलकाताचा पॉवर कोच म्हणून दिसेल, तर डूप्लेसिसने वाढते वय व स्पर्धेचा विचार करता आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगला प्राधान्य दिले. त्यामुळे लिलावात अधिक रक्कम घेऊन येणाऱ्या संघांकडे खरेदी करण्यासाठी पर्याय कमी झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल व इंग्लंडचा मोईन अली यांनीदेखील माघार घेतली.
आता रसेल, डूप्लेसिस, मॅक्सवेल, मोईन यांसारखे खेळाडू लिलावात नसल्यामुळे ग्रीन सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेरीस तेच खरे ठरले. २ कोटी मूळ किंमत असलेल्या ग्रीनसाठी मुंबईने सुरुवात केली. मात्र मुंबईकडे २.७५ कोटी इतकीच रक्कम असल्याने ते जास्त पुढे जाऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट होते. मग कोलकाता व चेन्नई यांच्यात खऱ्या अर्थाने जुगलबंदी पाहायला मिळाली. लिलावापूर्वी चेन्नईकडे ४३.४० कोटी, तर कोलकाताकडे ६४.३० कोटी इतकी रक्कम होती. अखेरीस कोलकाताने २५.२० कोटी रुपयांत ग्रीनला खरेदी केले.
आयपीएलच्या नियमांनुसार मिनी ऑक्शनमध्ये कोणताही खेळाडू १८ कोटीच्या पुढे गेला, तर त्याची वरील रक्कम ही बीसीसीआयच्या खेळाडू वेल्फेअर फंडला जाणार होती. त्यामुळे ग्रीनला प्रत्यक्षात १८ कोटी इतकीच रक्कम मिळणार असून वरील ७.२० कोटी बीसीसीआयकडे जमा होतील. ग्रीनने मिचेल स्टार्कचा विक्रम मोडीत काढला. स्टार्कला कोलकाताने २०२४मध्ये २४.७६ कोटी रुपयांत खरेदी केले होते.
त्यानंतर चेन्नईने अनपेक्षितपणे अनकॅप्ड खेळाडूंवर लावलेली बोली दिवसाचे वैशिष्ट ठरली. राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणारा १९ वर्षीय कार्तिकला चेन्नईने १४.२० कोटींमध्ये खरेदी केले. सध्या सुरू असलेल्या मुश्ताक अली स्पर्धेतही तो छाप पाडत आहे. तसेच उत्तर प्रदेशचा २० वर्षीय अष्टपैलू प्रशांतला १४.२० कोटी रुपयांत संघात आणून चेन्नईने एकप्रकारे रवींद्र जडेजाची जागा भरून काढली. गेल्या महिन्यात सर्व संघांना आपल्याकडे कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. त्यावेळी चेन्नईने ट्रेड विंडोद्वारे (खेळाडूंची अदलाबदल) संजू सॅमसनला संघात आणताना रवींद्र जडेजा व सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवले होते. सर्व संघांना कमाल २५ आणि किमान १८ खेळाडू संघात घेण्याची मुभा होती.
दरम्यान, आयपीएलचे आतापर्यंत १८ हंगाम झाले असून मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी ५ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. गतवर्षी विराट कोहलीच्या बंगळुरूने पंजाबला नमवून प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावले. २०२६चे वर्ष टी-२० क्रिकेटने भरलेले असणार आहे. विश्वचषकानंतर आयपीएलची रणधुमाळी रंगणार आहे.
पृथ्वी, सर्फराझ यांच्यावर अखेर बोली
मुंबईकर सर्फराझ खान आणि महाराष्ट्राकडून खेळणारा पृथ्वी शॉ यांच्यावर या लिलावात कोणी बोली लावणार की नाही, याकडे लक्ष होते. दोन्ही खेळाडू गेल्या हंगामात अपयशी ठरले होते. तसेच यंदाही लिलावाच्या पहिल्या फेरीत दोघांना कोणीही वाली लाभला नाही. अखेरीस दुसऱ्या फेरीत सर्फराझला चेन्नईने ७५ लाखमध्ये, तर दिल्लीने पृथ्वीला ७५ लाखांत खरेदी केले. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना आगामी आयपीएलमध्ये आपल्या बॅटची चमक दाखवण्याची संधी आहे. महीष थिक्षणा, मुजीब उर रहमान, डॅरेल मिचेल या खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही.
डीकॉक मुंबईत परतला; दानिश, अथर्वही संघात
मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने यंदाच्या आयपीएलमध्ये फारसे काही विकत घेण्यासारखे नव्हते. मात्र उपलब्ध असलेल्या २.७५ कोटी रकमेतही मुंबईने पाच खेळाडूंची योग्य निवड केली. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकला मुंबईने १ कोटी रुपयांत करारबद्ध केले. डीकॉक हा २०१९ व २०२०च्या विजेत्या मुंबई संघाचा भाग होता. त्याच्या पुनरागमनाने रोहितसह डीकॉक सलामीला येईल, हे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय मुंबईने विदर्भाचा फलंदाज दानिश मलेवार (३० लाख), मुंबईचाच डावखुरा अष्टपैलू अथर्व अंकोलेकर (३० लाख), वेगवान गोलंदाज मोहम्मद इझहार (३० लाख) व फलंदाज मयांक रावत (३० लाख) या चौघांना संघात स्थान दिले.