Delhi Capitals Sack Ricky Ponting As Head Coach   Twitter
क्रीडा

पाँटिंगची दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार रिकी पाँटिंग याची दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार रिकी पाँटिंग याची दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांत दिल्ली कॅपिटल्सला एकदाही जेतेपद जिंकून न देता आल्यामुळे पाँटिंगची उचलबांगडी करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीकडून शनिवारी याची घोषणा करण्यात आली. आता संघ संचालकपदी कायम असलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हाच पुढील मोसमात मुख्य प्रशिक्षकपदाच्याही भूमिकेत असेल.

पाँटिंगला सलग सात वर्षे देऊनही दिल्ली कॅपिटल्सला फारशी मजल मारता आली नाही. दिल्लीने फक्त २०२१मध्येच आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर दिल्लीला फारसे काही करून दाखवता आले नाही. पाँटिंगच्या कामगिरीविषयी संघ व्यवस्थापन नाखूश असल्यामुळेच त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

“दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही तुझ्या कामगिरीवर समाधानी नाहीत, असे पाँटिंगला कळवले आहे. गेल्या सात वर्षात दिल्ली कॅपिटल्सला एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकता आलेले नाही. सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याच्या हेतूने पुढील वर्षी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून आम्ही कमी करत आहोत,” असे दिल्ली कॅपिटल्सच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

आता आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत आणि संघबांधणीत कोण सहभागी होणार, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. यापुढे दिल्ली नवा मुख्य प्रशिक्षक नेमणार की गांगुलीकडेच सूत्रे सोपवणार, हे येत्या काळात समजेल. मेहनती आणि दिल्लीच्या यशात वाटा उचलणारे सहप्रशिक्षक प्रवीण अमरे हे संघासोबत कायम असतील. जेएसडब्ल्यू आणि जीएमआर ग्रूप या दिल्लीच्या सहमालकांमध्ये या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत दिल्ली कॅपिटल्सच्या भविष्यातील वाटचालीविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

खेळाडूंचे रिटेन्शन हासुद्धा दिल्लीपुढील प्रमुख पेच असणार आहे. जर चार खेळाडू रिटेन ठेवण्याचा निर्णय झाला तर दिल्लीला ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेजर मॅकगर्क किंवा दक्षिण आफ्रिकेच्या त्रिस्तान स्टब्स यांच्यापैकी एकाला सोडावे लागणार आहे. भारतीय खेळाडूंमधून कर्णधार ऋषभ पंत, अष्टपैलू अक्षर पटेल आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना रिटेन ठेवावे लागणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी