अहमदाबाद : गेल्या काही हंगामात खराब कामगिरी करणाऱ्या पंजाब किंग्जला आपल्या नेतृत्वाच्या जोरावर यशस्वी करण्याचा प्रयत्न कर्णधार श्रेयस अय्यरचा असेल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ते गुजरात टायटन्सविरुद्ध सलामीचा सामना मंगळवारी खेळणार आहेत.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या हंगामात विजेतेपद पटकावले होते. त्याआधी २०२० च्या हंगामात त्याने दिल्लीला चार वर्षांनंतर अंतिम फेरीपर्यंत पोहचवले होते. दरम्यान आता १८ वर्षांनंतर पंजाबला त्यांचे पहिलेवहिले जेतेपद मिळवून देण्याचे आव्हान श्रेयस समोर असेल.
पंजाबच्या संघाने २०१८ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये ते प्रथमच अंतिम फेरीत पोहचले होते. मात्र जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. गेल्या चार हंगामांत पहिल्या पाच संघांमध्ये राहण्यात पंजाबला अपयश आले आहे. दरम्यान आयपीएलच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी पंजाबचा संघ मैदानात उतरणार आहे.
श्रेयसमुळे पंजाबला एक तगडा कर्णधार मिळाला आहे. प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासोबत तो पुन्हा एका जोडला गेला आहे. यंदाच्या हंगामात विजयी सुरुवात करण्यासाठी हा संघ उत्सुक आहे.
दुसरीकडे शुभमन गिलसाठी गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सांभाळणे आव्हानात्मक आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये या संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०२३ च्या हंगामात अंतिम उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती. मात्र गत हंगामात गुजरातचा संघ आठव्या स्थानी फेकला गेला.
अय्यर आणि गिल हे दोन्ही कर्णधार सध्या चांगलेच फॉर्मात आहेत. दुबईत अलिकडेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने जेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेत अय्यर आणि गिल या दोघांनीही शानदार फलंदाजी केली.
गुजरातच्या फलंदाजीची वरची फळी तगडी आहे. गिल आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर ही जोडी संघाला खराब कामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील ठरू शकतात. वेस्ट इंडिजचा शर्फेन रुदरफोर्ड, साई सुदर्शन आणि मसूद शाहरूख खान यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. अष्टपैलू रशिद खान, राहुल तेवतीया, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि महिपाल लोमरोर हे खेळाडू संघाला मजबूत बनवू शकतात.
गोलंदाजीत मोहम्मद सिराज महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा, प्रसिध कृष्णा, जेराल्ड कोएट्झे आणि इशांत शर्मा हे गुजरातच्या वेगवान गोलंदाजीला ताकद देऊ शकतात. गुजरातच्या फिरकीची ताकद रशिद खान आहे. त्याला डावखुरा फिरकीपटू साई किशोर सहकार्य करू शकतो.
कर्णधार श्रेयस अय्यर, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, मार्कस स्टोइनिस, मार्को यान्सेन आणि ग्लेन मॅक्सवेल ही पंजाबच्या फलंदाजीची ताकद आहे. अझमतुल्ला ओमरझाई, स्टोइनिस, यान्सेन, शशांक सिंग आणि मुशीर खान हे अष्टपैलू खेळाडू संघासाठी फायदेशीर ठरू शकतात.
पंजाबच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व अर्शदीप सिंग करेल. लॉकी फर्ग्युसन, कुलदीप सेन आणि यश ठाकूर या गोलंदाजांचे अर्शदीपला सहकार्य मिळेल. चहल आणि हरप्रीत ब्रार यांच्याकडून यांच्यावर फिरकी विभागाची भिस्त असेल.
प्रतिस्पर्धी संघ
पंजाब किंग्ज : : श्रेयस अय्यर, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, ग्लेन फिलिप्स, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप